मलंग, 2 ऑक्टोबर : इंडोनेशियातील मलंग शहरात सर्वत्र शांतता पसरली आहे. शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 174 वर पोहोचली आहे. ही संख्या 200 च्या पुढे जाऊ शकते असे बोलले जात आहे. प्रत्यक्षात डझनभर लोकांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सर्वत्र गोंधळ माजला होता. आता या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस लोकांना बेदम मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जीव वाचवून लोक कसेतरी पळत आहेत. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने घबराट पसरली. हजारो लोकांनी कंजुरुहान स्टेडियमच्या एक्झिट गेटकडे मोर्चा वळवला, जिथे अनेकांचा श्वास गुदमरला.
स्टेडियमच्या व्हिडिओमध्ये शेवटची शिट्टी वाजल्यानंतर चाहते मैदानावर धावताना दिसत आहेत. आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंता म्हणाले, “संपूर्ण वातावरण गोंधळलेले होते. त्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ले सुरू केले, गाड्यांचे नुकसान केले. मृतांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चाहते बचावासाठी कुंपणावर चढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये मृतदेह जमिनीवर दिसत आहेत. स्टेडियममधून बाहेर पडण्यासाठी चाहते एकाच गेटवर पोहोचल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
तिकडे सुरक्षा मंत्री मोहम्मद महफूद यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, कंजुरुहान स्टेडियमवरील सामन्यासाठी 42,000 तिकिटे विकली गेली. तर, स्टेडियमची क्षमता 38,000 होती.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अरेमाच्या हजारो समर्थकांनी, त्यांच्या संघाच्या पराभवामुळे निराश होऊन, खेळाडू आणि फुटबॉल अधिकाऱ्यांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्या. चाहत्यांनी कंजुरुहान स्टेडियमच्या मैदानावर गर्दी केली आणि अरेमा व्यवस्थापनाला विचारले की 23 वर्षे घरच्या मैदानावर अपराजित राहिल्यानंतर संघ सामना कसा हरला?