भारताच्या संपूर्ण पुरुष क्रिकेट संघाने महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन आणि कौतुक केले. याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मुंबई, 30 जानेवारी : रविवारी आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपवर भारताच्या महिला संघाने आपलं नाव कोरलं. कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर महिला क्रिकेटपटुंवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच लखनौ येथे न्यूझीलंड संघाला पराभूत करून मालिकेत 1-1 ने बरोबरी मिळवणाऱ्या भारताच्या पुरुष टी 20 संघाने पहिला अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड जिंकणाऱ्या महिला संघाचे अभिनंदन केले. दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वहिल्या आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पारपडला. भारतीय महिला संघाने इंग्लंड संघाला ७ विकेट्सने पराभूत करून आयसीसीचा पहिला अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. हे ही वाचा : टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंचा बॉलीवूड गाण्यावर विक्ट्री डान्स, Video Viral तर रविवारीच भारताच्या पुरुष संघाचा न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेतील दुसरा सामना लखनौ येथे पारपडला. यात भारतीय संघाने निसटता विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या पुरुष संघाने या विजयानंतर अंडर 19 महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या महिला संघाचे अभिनंदन केले.
भारताच्या पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड याने सर्वप्रथम महिला संघाचे ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल कौतुक केले. त्यानंतर त्याने आपला माईक भारताचा युवा क्रिकेटर आणि भारताच्या अंडर १९ संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार पृथ्वी शॉकडे दिला. पृथ्वी शॉने भारताच्या संपूर्ण पुरुष क्रिकेट संघातर्फे भारताच्या महिला महिला अंडर 19 संघाचे अभिनंदन आणि कौतुक केले. याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.