मुंबई, 31 जानेवारी : भारताचा मराठमोळा क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर हा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मंगळवारी शार्दुल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटून यावेळी विविध गोष्टींवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत गोलंदाज शार्दूल ठाकूर याचा समावेश करण्यात आला होता. शार्दूल हा मूळचा पालघर जिल्ह्यातील असून तेथेच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. शार्दूल ठाकूर हा फेब्रुवारी महिन्यात मित्ताली परुळकर हिच्या सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तेव्हा या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी त्याने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये शार्दूल आणि मित्ताली यांचा साखरपुडा मुंबई येथे पार पडला होता. फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेला हे दोघे लग्न करणार असून या लग्नाला 200-250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच शार्दूल भारतीय संघाच्या शेड्यूलमुळे खूप व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी त्याची पत्नी मिताली परुळकर करीत आहे. हे ही वाचा : ऑस्ट्रेलिया सीरिजआधी विराट-अनुष्का पोहोचले ‘बाबां’च्या चरणी, पाहा PHOTO लग्नाच्या आमंत्रणासोबतच पालघर भागातील क्रिकेट मैदानांची दुरवस्था आणि ग्रामीण भागात क्रिकेटला चालना मिळावी. या विषयांवरही शार्दूल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.