मुंबई, 16 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक विचित्र असा प्रकार घडला त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. डीआरएस सिस्टिम काही वेळ काम करणं बंद झाली होती. डीआरएस काम करत नसल्यानं बांगलादेशचे खेळाडू संतापल्याचं दिसत होतं. भारताच्या दुसऱ्या डावातील 32व्या षटकात हा प्रकार घडला. यासिर अलीच्या चेंडूवर पहिला चेंडू स्टम्पच्या बाहेरून वळला आणि शुभमन गिलच्या पुढच्या पायाच्या पॅडवर आदळला. यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी बाद असल्याचं अपील केलं. पण मैदानावरील पंचांनी हे अपिल फेटाळून लावलं. तेव्हा कर्णधार शाकिब अल हसनने खेळाडूंसोबत चर्चा करून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे डीआरएससाठी सिग्नल दिला. पण तिसऱ्या पंचांनी धक्कादायक असं उत्तर दिलं. हेही वाचा : एक असाही टी२० सामना! १५ धावात संघ गारद, दोन गोलंदाजांनी उडवली फलंदाजांची भंबेरी
पंचांनी डीआरएस सिस्टिम डाऊन झाल्याचं सांगितलं आणि रिव्ह्यू करू शकणार नसल्याचं म्हटलं. डीआरएस काम करत नसल्याचं समजताच बांगलादेशचे खेळाडू रागात दिसले. शाकिबला तर राग अनावर झाल्याचं दिसत होतं. बांगलादेशचे खेळाडू थोडा वेळ नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहिले. मात्र थोड्या वेळाने सामना पुन्हा सुरू झाला.
डीआरएस सिस्टिम सुरू झाल्यानतंर पुन्हा रिप्ले दाखवण्यात आला त्यामध्ये स्पष्ट दिसलं की बांगलादेशच्या संघाने रिव्ह्यू गमावला असता. चेंडू लाइनच्या बाहेर पडत असल्याचं स्पष्ट दिसत होतं तसंच इम्पॅक्टसुद्धा बाहेरच्या बाजूला होता. म्हणजेच बांगलादेशच्या सुदैवाने डीआरएस डाऊन झाल्यानं त्यांचाच फायदा झाला. हेही वाचा : पाच वर्षात फक्त 8 कसोटीत संधी, कुलदीपचे 22 महिन्यांनी पुनरागमन अन् केला विक्रम शुभमन गिलने दुसऱ्या डावात जबरदस्त खेळी करत कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. शुभमन गिलने 152 चेंडूत 110 धावा केल्या. गिलने त्याच्या डावात 10 चौकार आणि तीन षटकार मारले होते. गिल मेहदी हसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झधाला होता. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात संपुष्टात आला होता. यानंतर भारताने दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशला 513 धावांचे आव्हान दिले आहे.