मुंबई, 16 डिसेंबर : टी20 क्रिकेट म्हणजे धावांचा पाऊस असंच काहीसं असतं. मात्र ऑस्ट्रेलियातील घरेलू टी20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजांनी फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडवली आहे. बीग बॅश लीगमधला आज झालेला सामना ऐतिहासिक ठरला आहे. सीडनी थंडर्स संघासाठी तर ही नकोशी आठवण असणार आहे. एडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध खेळताना सीडनी थंडर्सचे सर्व फलंदाज ढेपाळले. त्यांना केवळ 15 धावा करता आले. टी20 क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. बीग बॅश लीगच्या यंदाच्या हंगामातील पाचवा सामना सीडनी थंडर्स आणि एडलेड स्ट्रायकर्स यांच्यात झाला. सीडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात एडलेडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एडलेडने 9 बाद 139 धावा केल्या आणि सीडनी थंडर्सला 140 धावांचे आव्हान दिले. हेही वाचा : पाच वर्षात फक्त 8 कसोटीत संधी, कुलदीपचे 22 महिन्यांनी पुनरागमन अन् केला विक्रम
सीडनी थंडर्सचा संघ सहज जिंकेल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात उलट घडलं. एडलेडचा वेगवान गोलंदाज हेन्री थॉर्टन आणि वेस एगर यांच्या गोलंदाजीसमोर सीडनीचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. दोन्ही गोलंदाजांनी मिळून 9 गडी बाद केले. संपूर्ण संघ 5.5 षटकात फक्त 15 धावात गारद झाला. एडलेडच्या संघाने सीडनी थंडर्सला 15 धावात गारद करून सामना 124 धावांनी जिंकला. या सामन्यात हेन्रीला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. त्याने 2.5 षटकात फक्त 3 धावात 5 गडी बाद केले. तर एगरने 2 षटकात 6 धावात 4 गडी बाद केले.
सीडनी थंडर्सचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. सीडनी थंडर्सचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. यासह संघाच्या नावावर टी२० मध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला. त्यांनी तीन वर्षांपूर्वीचा तुर्कीच्या संघाचा विक्रम मोडला. तुर्कीने झेक प्रजासत्ताक विरुद्धच्या सामन्यात ८.३ षटकात फक्त २१ धावाच केल्या होत्या.