टीम इंडिया का हरली?
दुबई, 6 सप्टेंबर: आगामी विश्वचषक मोहिमेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण आशिया चषकातील सुपर फोर फेरीत झालेल्या सलग दोन पराभवांमुळे भारताचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आधी पाकिस्तान आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानं टीम इंडियासमोरच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. पण दुबईतल्या या सामन्यात रोहित शर्मा अँड कंपनीचं नेमकं काय चुकलं? श्रीलंकेच्या तुलनेत टीम इंडिया कुठे कमी पडली? 1- आघाडीच्या फलंदाजांचं अपयश भारतीय संघाचे आघाडीचे प्रमुख शिलेदार पुन्हा एकदा अपयशी ठरले. लोकेस राहुल आणि विराट कोहली पॉवर प्लेतच बाद झाल्यानं सुरुवातीला दबाव वाढला. त्यामुळे रोहित आणि सूर्यकुमार या जोडीला संघाला सावरण्यासाठी संथ खेळी करावी लागली. सूर्यकुमारनं 34 धावांची खेळी 29 चेंडूत केली. 2 - राहुलचा संघर्ष टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलचा फॉर्म ही चिंतेची बाब ठरावी. आशिया चषकाच्या तीन सामन्यात मिळून राहुलनं केवळ 43 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असताना तो केवळ 7 धावा काढून बाद झाला. त्यामुळे विश्वचषकाआधी तो फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. 3- रिषभ पंतकडून पुन्हा निराशा रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं भारतीय डावाला आकार दिल्यानंतर मधल्या फळीतल्या रिषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण हाणामारीच्या षटकात खराब फटका खेळून पंत बाद झाला. 4 - अनुभवी भुवनेश्वरचं खातं रिकामं करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं मात्र निराशा केली. भुवीनं या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या. पण नव्या चेंडूवर सलामीची जोडी फोडणं त्याला जमलं नाही. संपूर्ण सामन्यात भुवीचं विकेटचं खातं रिकामच राहिलं.
5 - चुकीची संघनिवड रोहित शर्मानं या सामन्यातही 5 गोलंदाज खेळवून पुन्हा मोठी चूक केली. त्यानं रवी बिश्नोईच्या जागी रवीचंद्रन अश्विनला संघात घेतलं. पण अक्षर पटेलला पुन्हा डावललं. शिवाय दीपक हुडासारखा अष्टपैलू खेळा़डू संघात असताना गोलंदाजीत त्याचा वापर केला नाही. त्यामुळे केवळ फलंदाज म्हणून हुडाला संघात का खेळवलं असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.