कोलकाता, 12 जानेवारी : एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवची जादू चालली. त्याने श्रीलंकेच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. गुवाहाटीत भारताच्या गोलंदाजांची डोकेदुखी ठरलेल्या कर्णधार दसुन शनाकाला बाद केलं. शनाका फक्त दोन धावांवर कुलदीपच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडिस आणि चरिथ असलका हे कुलदीपच्या जाळ्यात अडकले. यामुळे कुलदीप यादवचं कौतुक होत आहे. दरम्यान, कुलदीपने कमाल केल्यानंतर युझवेंद्र चहलला ट्रोल केलं जात आहे. पहिल्या सामन्यात चहल प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देऊन कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. यामुळे तो चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. चलहलला दुखापतीमुळे या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.
हेही वाचा : तालिबानच्या निर्णयावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया नाराज, अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार
कुलदीपने बांगलादेश दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. मात्र तरीही भारतीय संघातून त्याला वगळण्यात आले होते. आज पुन्हा संधी मिळताच त्याने ३ विकेट घेत कमाल केली. त्याच्या या कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सतत संधी मिळाल्यानंतरही युझवेंद्र चहलला म्हणावी तशी चमक दाखवता न आल्यानं त्याच्यावर चाहत्यांनी टीका केलीय.