रवी शास्त्री आणि विराट कोहली
मुंबई, 22 ऑगस्ट**:** भारतीय संघ आगामी आशिया चषकासाठी सज्ज झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलामीच्याच लढतीत पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. या लढतीदरम्यान सर्वांच्या केंद्रस्थानी असेल तो टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली. गेल्या काही महिन्यांपासून विराटच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी झालाय. त्यामुळे खराब फॉर्ममुळे विराटवर टीकाही होतेय. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र विराटच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. इंग्लंड दौऱ्यातल्या खराब फॉर्मनंतर विराटला एका ब्रेकची गरज आहे असं शास्त्री यांनी म्हटलं होतं. विराटनंही अगदी तसच केलं. त्यानं वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे मालिकेतून विश्रांती घेतली. आणि आता हाच विराट नव्या दमानं आशिया चषकाच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. सगळ्यांची तोंडं बंद होतील… शास्त्री यांनी नुकतीच स्टार स्पोर्टसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आशिया चषकात विराट पुन्हा फॉर्ममध्ये येईल असा विश्वास व्यक्त केलाय. इतकच नव्हे तर त्यांनी हेही म्हटलंय की, ‘जर विराटनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या तर सगळ्यांची तोंडं बंद होतील. विराटनं याआधी क्रिकेटमध्ये मोठं योगदान दिलं आहे. पण तो आता इतिहास झाला आहे. लक्षात घ्या लोक पटकन विसरुन जाताच. तसच विराटच्या बाबतीतही झालंय. पण विराटसमोर आता एक मोठी संधी संधी आहे.’ भारताची सलामी पाकिस्तानशी आशिया चषकात टीम इंडियाचा सलामीचा सामना होणार तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. 28 ऑगस्टच्य़ा संध्याकाळी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध महत्वाची बाब म्हणजे विराटनं आपल्या वन डे कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ही पाकिस्तानविरुद्धच केली आहे. 2012 सालच्या आशिया चषकाच्याच सामन्यात विराटनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. त्या सामन्यात विराटच्या बॅटमधून तब्बल 183 धावा निघाल्या होत्या. विराटची ही वन डे क्रिकेटमधली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. आशिया चषकात विराटनं आतापर्यंत दमदार कामगिरी बजावली आहे. हेही वाचा - Asia Cup 2022: आधी बुमरा आता कोच राहुल द्रविड… आशिया चषकाआधी टीम इंडियाला दोन धक्के विराटची आशिया चषकातील आकडेवारी सामने – 16 धावा – 766 शतकं – 3 अर्धशतकं – 2 सरासरी – 63.83