मुंबई, 14 जानेवारी : आयसीसी अंडर १९ महिला वर्ल्ड कप २०२३ ची भारताने विजयी सुरुवात केली आहे. शनिवारी बेनोनीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटने पराभूत केलं. भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा आणि सलामीची बॅटर श्वेता सेहरावत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७.१ षटकात ७७ धावांची भागिदारी केली. शेफालीने १६ चेंडूत ४५ धावा केल्या. यात ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शेफालीला मियान स्मिटने रेन्सबर्गकडे झेल देण्यास भाग पाडलं. यानतंर सेहरावतने जी तृषा आणि सौम्या तिवारीसोबत उपयुक्त भागिदारी केली.
हेही वाचा : वडील शेतकरी, घरचा दुधाचा व्यवसाय; कोण आहे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे? अंडर १९ महिला टी२० वर्ल्ड कपमधील भारताने पहिला सामना २१ चेंडू राखून जिंकला. श्वेता सेहरावतने ५७ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या. यात २० चौकारांचा समावेश होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात जबरदस्त होती. त्यांनी चार षटकातच ५६ धावा केल्या होत्या. सोनम यादवने रेन्सबर्गला बाद करून ही भागिदारी संपुष्टात आणली. त्यानंतर कर्णधार ओलुहले सियो खातेही न उघडता शेफाली वर्माच्या गोलंदाजीवर बाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या विकेट ठराविक अंतराने पडल्याने त्यांना २० षटकात १६६ धावाच करता आल्या. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.