भारत आणि पाक संघातले खेळाडू
दुबई, 31 ऑगस्ट**:** दुबईत रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात महामुकाबला पार पडला. हा सामना पाच विकेट्सनी जिंकून टीम इंडियानं गेल्या वर्षीच्या टी20 विश्वचषकातल्या पराभवाचा वचपा काढला. हार्दिक पंड्याच्या ऑलराऊंड परफॉर्मन्सनं हा सामना भारताच्या झोळीत टाकला. सामना रंगतदार झाला. भारत जिंकला, पाकिस्तान हरली पण त्याचबरोबर आयसीसीनं दोन्ही संघातील खेळाडूंवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. आणि त्यामुळे दोन्ही संघातल्या खेळाडूंना सामना मानधनाच्या 40 टक्के रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे. स्लो ओव्हर रेटचा फटका आयसीसीच्या नियमानुसार सामना निर्धारित वेळेत संपवणं बंधनकारक असतं. असं न झाल्यास अतिरिक्त वेळेत टाकलेल्या प्रत्येक षटकामागे खेळाडूंच्या सामना मानधनातील 20 टक्के रक्कम कापण्यात येते. भारत आणि पाकिस्तान सामन्यात दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत षटकं पूर्ण केली नाहीत. रोहित शर्मा आणि बाबर आझमच्या संघाला त्या वेळेत अठरा षटकंच टाकता आली. त्यामुळे उरलेल्या दोन षटकांमागे प्रत्येक संघातील खेळाडूंना 40 टक्के दंड लावण्यात आला. हेही वाचा - Asia Cup 2022: ‘विराटच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल’, साऊथच्या या सुपरस्टारनं व्यक्त केली इच्छा
आयसीसीच्या नव्या नियमामुळे फटका
जून 2022 पासून आयसीसीनं सामन्यांना होणारा उशीर पाहता एक नवा नियम लागू केला. या नियमानुसार जर एखादा संघ निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण करु शकला नाही तर त्यापुढच्या अतिरिक्त वेळेत फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्सही नव्यानं लागू करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त वेळेत पाच ऐवजी केवळ चारच फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत. याचा फटका फिल्डिंग करणाऱ्या संघाला किंबहुना उशीर करणाऱ्या संघाला बसणार आहे. भारत पाकिस्तान सामन्यातही रोहित आणि बाबरला शेवटच्या दोन षटकात याच परिस्थितीला सामोरं जावं लागलं. दरम्यान सामन्यामधले ब्रेक्स वगळता 85 मिनिटात टी20 सामन्यातील एक इनिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येक कर्णधाराला हे माहित व्हावं यासाठी मोठ्या स्क्रीनवर ही वेळही दाखवली जाते.