मुंबई, 10 जानेवारी : सध्या भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामन्यांसोबतच भारतात रणजी ट्रॉफीचे सामने देखील सुरु आहेत. दोन्ही स्पर्धांमध्ये खेळाडू धावांचा पाऊस पाडतायत तर गोलंदाज फलंदाजांच्या विकेट काढण्यातही यशस्वी ठरतायत. मात्र अशातच आज एका सामन्यादरम्यान मधमाश्यांनी थेट क्रिकेटच्या मैदानात मोर्चा वळवून खेळाडूंना सळोकी पळो करून सोडले. आज राजस्थान विरुद्ध कर्नाटक या दोन संघांमध्ये रणजी सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र कर्नाटकच्या गोलंदाजांसमोर राजस्थानच्या संघाने खराब कामगिरी केली. पहिल्या डावात त्यांना केवळ 129 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कर्नाटक फलंदाजीला उतरला तेव्हा राजस्थानच्या क्षेत्ररक्षणादरम्यान मधमाशांनी खेळाडूंवर हल्ला केला. मधमाश्यांनी खेळाडूंवर हल्ला केल्याचे दृश्य पाहिल्यानंतर मैदानात खळबळ उडाली. सर्व खेळाडूंनी मैदानावर लोटांगण घातले. काही वेळाने मधमाशा मैदानातून निघून गेल्यावर पुन्हा उठले आणि सामना पुन्हा सुरू झाला. मधमाशांमुळे कोणत्याही खेळाडूला इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या घटनेचा सामन्यावर फार काही परिणाम झाला नाही. हे ही वाचा : विराट कोहलीच्या 73 व्या शतकानंतर अनुष्का शर्माने शेअर केली खास पोस्ट क्रिकेट सामन्यात मधमाश्यांच्या हल्ल्याचा इतिहास क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही असे अनेकदा घडले आहे. इतर देशांच्या क्लब किंवा काऊंटी सामन्यांदरम्यानही मधमाशांमुळे मैदानावर घबराट पसरल्याचे दिसून येत आहे.