मुंबई, 10 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार शतक झळकावले आहे. विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 73 वे शतक असून वनडे मालिकेतील विराटाचे हे 45 वे शतक आहे. विराट कोहलीने नवीन वर्षात खेळलेल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. विराटच्या 73 व्या शतकी खेळीनंतर पत्नी अनुष्काने शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी पोस्ट केली आहे. विराट कोहली नेहमी आपल्या यशाचे श्रेय त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला देत असतो. दोन वर्ष जेव्हा विराट कोहली त्याच्या फॉर्मात नव्हता तेव्हा अनुष्का शर्माने त्याला मोलाची साथ दिली. विराट कोहलीने गेल्यावर्षी आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकल्यानंतर अनुष्का आणि त्याची मुलगी वामिका यांदोघींचे आभार मानले होते. श्रीलंका विरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने शतक ठोकल्यानंतर अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीत अनुष्काने भारत विरुद्ध श्रीलंका सामना सुरु असताना विराट कोहलीचा टीव्ही स्क्रीनवरील फोटो शेअर केला. त्यावर तिने लाल हार्टचा इमोजी देखील लावला.
विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मायदेशात 160 सामन्यांमध्ये 20 वेळा शतक ठोकले होते. तर विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या केवळ 99 सामन्यात 20वेळा शतक ठोकण्याचा पराक्रम केलं आहे. विराटच्या शतकानंतर त्याच्यावर सध्या सर्वस्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.