फिफा वर्ल्ड कपच्या पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली. लियोनेल मेस्सीचं वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण वर्ल्ड कप जिंकल्यानतंर दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीची गोष्ट रंजक अशी आहे. ज्या वर्ल्ड कपसाठी संघांनी कठोर मेहनत घेतलेली असते त्या वर्ल्ड कप स्पर्धेची ट्रॉफी विजेत्यांना फक्त जल्लोष साजरा करण्यापुरती दिली जाते. पुरस्कार समारंभानंतर फिफाचे अधिकारी विजेत्या संघाकडून ती ट्रॉफी परत घेतात. विजेत्या संघाला ही ट्रॉफी त्यांच्या देशात नेता येत नाही. याऐवजी त्यांना वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते जी कांस्य असते आणि वरून सोन्याच्या पत्र्याने मढवण्यात येते. फिफा वर्ल्ड कपची खरी ट्रॉफी ही ज्युरिचमध्ये फिफाच्या मुख्यालयात ठेवण्यात येते. फिफा वर्ल्ड कप टूर, वर्ल्ड कपच्या सामन्यावेळीच ही ट्रॉफी बाहेर काढण्यात येते. 2005 मध्ये फिफाने खरी ट्रॉफी विजेत्या संघाला न देण्याचा नियम बनवला. तेव्हापासून विजेत्यांना ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते.
पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्ड कप 1930 मध्ये सुरू झाला होता. तेव्हा विजेत्या संघाला देण्यात आलेल्या ट्रॉफीचं नाव जूल्स रिमेट असं होतं. ही ट्रॉफी 1970 पर्यंत विजेत्या संघांना देण्यात आली. यानंतर वर्ल्ड कप ट्रॉफी नव्याने डिझाइन करण्यात आली. नवी ट्रॉफी डिझाइन करण्याचं काम इटालियन आर्टिस्ट सिल्वियो गजानियाला देण्यात आलं होतं. 1974 पासून हीच ट्रॉफी दिली जाते आणि हिला फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी असं म्हटलं जातं.
फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचं वजन जवळपास 6.175 किलोग्रॅम इतकं असून ही तयार करण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची उंची 36.8 सेंटीमीटर आहे तर तळाचा व्यास 13 सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या खाली एक मॅलाकाइट स्टोनच्या दोन लेअर आहेत. 1994 मध्ये या ट्रॉफीत थोडा बदल करून खाली विजेत्या संघाचे नाव लिहिण्यासाठी एक प्लेट लावण्यात आली होती.