मुंबई, 19 डिसेंबर : पेनल्टी शूटआऊटवर रंगलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं असून लियोनेल मेस्सीचं स्वप्नही पूर्ण झालं. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचे सामन्यात एकतर्फी वर्चस्व होतं. सेकंड हाफमध्येही त्यांनी चेंडूवर ताबा ठेवला होता. पण अखेरच्या दहा मिनिटात फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने दीड मिनिटात केलेल्या दोन गोलने सामन्याची उत्कंठा वाढवली. त्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्येही थरारक लढत दिसली. पण हॅट्ट्रिक करूनही एम्बाप्पेला विजेतेपदाने हुलकावणी दिली. यावेळी अश्रू अनावर झालेल्या एम्बाप्पेला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट मैदानात येऊन आधार दिला. सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरलेल्या फ्रान्सला शेवटी पराभूत व्हावं लागलं. यामुळे एम्बाप्पेच्या डोळ्यात अश्रू आले होते. तेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष व्हीआयपी बॉक्समधून मैदानात आले होते. निराश होऊन बसलेल्या एम्बाप्पेचं त्यांनी सांत्वन केले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा : FIFA : वर्ल्ड कप जिंकले तरी विजेत्यांना खरी ट्रॉफी देत नाहीत, कारण…
एम्बाप्पेने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ८ गोल केले. त्याने गोल्डन बूट पटकावला. जेव्हा गोल्डन बूट घेण्यासाठी गेला तेव्हा व्यासपीठावर वर्ल्ड कप ठेवण्यात आलेला होता. हातात गोल्डन बूट घेऊन परतताना एक क्षण वर्ल्ड कप ट्रॉफीकडे त्याचं लक्ष गेलं. तेव्हाची त्याची प्रतिक्रियासुद्धा भावुक करणारी आहे. अंतिम सामन्यात पहिल्या ७८ मिनिटात फ्रान्सला गोल नोंदवता आले नव्हते. मात्र अर्जेंटिनाच्या खेळाडुचा फाऊल झाल्यानतंर ८० व्या मिनिटाला एम्बाप्पेने पेनल्टीवर गोल करत खातं उघडलं. त्यानतंर लगेच दीड मिनिटात एम्बाप्पेने दुसरा गोल केला आणि सामन्यात बरोबरी साधली. अतिरिक्त वेळेत मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली होती. पण पुन्हा एम्बाप्पेनं गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्येही एम्बाप्पेने पहिला गोल केला.