गुवाहाटी, 10 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ च्या तयारीच्या दृष्टीने एकदिवसीय मालिका महत्त्वाची ठरणार आहे. गुवाहाटीतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. तेव्हा त्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी दिली नाही. यानंतर चाहत्यांनी रोहित शर्मासह बीसीसीआयवर टीकेची झोड उठवलीय. रोहित शर्माने स्पष्ट सांगितलं की, गेल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक केलं तरी इशान किशनला अजून वाट बघावी लागेल. रोहित शर्मा म्हणाला की, हे दुर्दैवी आहे की आम्ही इशान किशनला खेळवू शकणार नाही. गेल्या आठ नऊ महिन्यात जी परिस्थिती होती आणि जे सामने झाले ते पाहता शुभमन गिलला संधी देणं योग्य होईल. त्या क्रमांकावर त्याने चांगली कामगिरी केली आहे. फॉर्म महत्त्वाचा आहे, पण फॉरमॅटही तेवढाच गरजेचा आहे. हेही वाचा : IND VS SL : बुमराहची जागा घेतली ‘या’ खेळाडूने; अशी आहे टीम इंडियाची प्लेयिंग ११ ऋषभ पंत कार अपघातात जखमी होण्याआधीच लोकेश राहुलकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाची जबाबदारी दिली जाणार हे निश्चित होतं. त्यामुळे वर्ल्ड कप आधी संघात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करून त्याने जागा वाचवली आहे.
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला आले. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर असेल. तर पाचव्या नंबरवर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या असणार आहे. यानंतर गोलंदाज असतील.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणाऱ्या इशान किशनला आणि टी२० मध्ये नाबाद शतक करणाऱ्या सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेतल्यानं चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच यासाठी केएल राहुल जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. इशान किशनला या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी द्यायला हवी होती. त्यामुळे इशान किशन आणि सूर्यकुमार यादव अशा दोघांनाही संघात स्थान मिळालं असतं.
चाहत्यांनी म्हटलं आहे की, सूर्यकुमार यादवला खेळवायला हवं, त्याच्यामुळेच आम्ही पुन्हा मॅच बघायला सुरुवात केली आहे. तर सूर्यकुमार यादवला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवावं अशी मागणीही केली जात आहे.
रोहित शर्माने स्पष्ट सांगितलं होतं की, ज्या खेळाडूंनी कामगिरी केली आहे त्यांना संधी मिळेल. ही एक साधी गोष्ट आहे. कधी कधी आम्ही जेव्हा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना करतो तेव्हा कठीण होऊन जातं. फॉर्म आणि फॉरमॅट दोन्ही महत्त्वाचे आहे.