मुंबई, 28 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीममधील स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीनंतर शानदार पुनरागमन केलं आहे. या खेळामुळे त्याने स्वतःला टी-20 मधील सर्वोत्तम ऑलराउंडर खेळाडूंपैकी एक म्हणून सिद्ध केलंय. हार्दिकच्या खेळानं भारतीय फॅन्ससह जगभरातील क्रिकेटपटू प्रभावित झाले आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट टीममध्ये सध्याच्या घडीला हार्दिक पंड्यासारखा फिनिशर नसल्याचा दावा त्यांच्या टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं केला आहे. तसंच पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2022 क्रिकेट स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये काही सुधारणा करण्याचं आवाहन केलं. आशिया चषक 2022 मध्ये हार्दिक केवळ 50 रन करू शकला होता. परंतु, त्याने पाकिस्तानविरुद्ध ग्रुप मॅचमध्ये 17 बॉलमध्ये 33 रनांची नाबाद खेळी खेळून भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीजमध्येही हार्दिकने चांगली कामगिरी केली. रविवारी (25 सप्टेंबर 2022) झालेल्या टी-20 मॅचमध्येही शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिकने भारताला मॅच जिंकून दिली. यामुळेच ही सीरीज भारतने 2-1 ने जिंकली दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट टीमची कामगिरी जेमतेम होत आहे. नुकत्याच संपलेल्या 2022 आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तान श्रीलंकेकडून पराभूत झाला. तसंच सध्या पाकिस्तानची त्यांच्याच देशात इंग्लंडविरुद्ध 7 मॅचची टी-20 सीरीज सुरू आहे. यामध्ये पाकिस्तान 2-2 बरोबरीत आहे. त्यातच आता आफ्रिदीने पाकिस्तानच्या टीमबाबत मोठं वक्तव्य केलंय. पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये सातत्याने चांगली खेळी करण्याचा अभाव असल्याचंही त्याने अधोरेखित केलं. …म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल शाहिद आफ्रिदी म्हणाला… समा टीव्हीच्या एका शोमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये हार्दिक पंड्यासारखा फिनिशर नाही. आसिफ अली आणि खुशदिल हे काम करतील, असं वाटलं होतं; पण त्यांना ते जमलं नाही. नवाझ आणि शादाब हे दोघेही तेवढे सक्षम नाहीत. या चारपैकी किमान दोन खेळाडूंच्या खेळात सातत्य असायला हवं. शादाब कोणत्या वेळी बॉलिंग करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तो उत्कृष्ट बॉलिंग करतो, त्या दिवशी पाकिस्तान जिंकतो.’ पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची जोरदार तयारी सर्वच टीमची सुरू आहे. हा वर्ल्ड कप कोण जिंकणार, याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. त्यातच शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट टीमकडे फिनिशर नसल्याचं वक्तव्य करीत या टीमची कमकुवत बाजू उघड केली आहे.