मुंबई, 1 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्रिक्रेट स्पर्धेला खऱ्या अर्थानं आता रंग चढायला सुरुवात झाली आहे. भारतीय टीमनं स्पर्धेतील पहिल्या दोन मॅच जिंकल्यामुळे ही टीम सेमी फायनलला जाण्याची शक्यता वाढली आहे. विशेषत: पाकिस्तानविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार बनली आहे. दावा केला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत होणारी भारतीय टीमची मॅच साहजिकच कोणत्याही क्रिकेटप्रेमीला चुकवायची नाही. या वेळी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होत असल्यानं बहुतांश मॅच दुपारी आहेत. त्यामुळे अनेकवेळा मॅचच्या वेळीच लोक ऑफिसमध्ये असतात. मात्र, असं असूनही अनेकजण मॅचचं नेमकं काय झालं? कोणती टीम विजयी झाली? कोणाचा स्कोअर किती झाला? याबाबत अपडेट घेत असतात. एवढचं काय, तर प्रवासातसुद्धा मॅचचे अपडेट घेतले जातात. मात्र, तुम्हाला हे समजल्यानंतर आश्चर्य वाटेल की, एका व्यक्तीनं तर विमान प्रवासादरम्यान मॅचचा स्कोअर विचारला, त्यानंतर जे घडलं ते अनपेक्षित असंच होतं. नेमके काय घडले? रविवारी (30 ऑक्टोबर 2022) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मॅच होती. याचवेळी एक क्रिकेटप्रेमी इंडिगोच्या फ्लाइटनं प्रवास करत होता. या क्रिकेटप्रेमीनं विमानाच्या पायलटकडे भारत-दक्षिण आफ्रिका मॅचच्या स्कोअरचे अपडेट मागितले. विशेष म्हणजे पायलटनं एका कागदावर स्कोअर अपडेट लिहून तो कागद संबंधित क्रिकेटप्रेमीला पाठवला. अखेर या क्रिकेटप्रेमीनं पायलटनं ज्या कागदावर स्कोअर लिहून पाठवला होता, त्या कागदाचा फोटो काढून तो ट्विट केला आहे. हा फोटो विमानात क्लिक करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
इंडिगोनेही दिलं उत्तर विक्रम गर्ग नावाच्या व्यक्तीनं हा फोटो ट्विट केला असून, त्यासोबत लिहिलं आहे की,‘आज भारत हरला; पण इंडिगोच्या पायलटनं माझं मन जिंकलं. प्रवासादरम्यान मॅचच्या स्कोअरचे अपडेट देण्याची विनंती केल्यानंतर पायलटनं एका कागदावर स्कोअर अपडेट पाठवले.’ 30 ऑक्टोबर 2022 रोजी पोस्ट केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला आतापर्यंत 500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंडिगोनेही गर्ग यांच्या ट्विटला उत्तर दिलं असून, त्यांनी म्हटंलंय की, ‘ आम्हाला हे पाहून आनंद झाला, तुम्हाला लवकरच पुन्हा फ्लाइटमध्ये भेटायचं आहे.’ Ind vs Ban: भारत-बांगलादेश मॅचवर पावसाचं संकट, टीम इंडियाचं काय होणार? दरम्यान, भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये फास्ट बॉलर लुंगी एनगिडीची घातक बॉलिंग आणि एडन मार्करम आणि डेव्हिड मिलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच विकेटनं पराभव केला. ऑप्टस स्टेडियमच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीशी जुळवून घेऊ न शकलेल्या आघाडीच्या फळीतील बॅटर्सचं अपयश हे भारताच्या पराभवाचं कारण ठरलं.