मुंबई, 30 एप्रिल : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल 2022 निराशाजनक ठरलं आहे. मुंबईनं आत्तापर्यंत खेळलेले सर्व आठ सामने गमावले आहेत. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या या टीमवर आजवर कुणावरही ओढवली नाही, अशी नामुश्की ओढावली आहे. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचे कारण कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) साधारण खेळ हे देखील आहे. रोहितनं या सिझनमधील आठ सामन्यांमध्ये फक्त 153 रन केले आहेत. त्याला अद्याप एकदाही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रोहित शर्माचा फॉर्म, त्याची टीम निवड तसंच मैदनामधील डावपेच यावर सध्या चांगलीच टीका होत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर आणि क्रिकेट कॉमेंटेटर इयन बिशप (Ian Bishop) यांनी रोहितबद्दल मोठा दावा केला आहे. मुंबई इंडियन्सचा यापूर्वीच्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरद्ध पराभव झाला. या पराभवानंतर बिशप यांनी रोहितची भेट घेतली होती. ‘सततच्या पराभवामुळे रोहित शर्मा आपल्याला खचलेला दिसला’ असा दावा बिशप यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना केला आहे. ‘मी रोहित शर्माशी बोललो त्यावेळी तो खचलेला दिसला. हे स्वाभाविक आहे. कारण, त्याच्या फ्रँचायझीची परंपरा मोठी आहे. मुंबई इंडियन्सनं आता काही बदल करण्याची गरज आहे. माझ्या मते त्यांनी टीम डेव्हिडला (Tim David) खेळवलं पाहिजे. डेव्हिडला जास्त का खेळवलं नाही हे मला माहिती नाही.त्यांना बॅटींग लाईनअपमध्ये चांगले रन करणारा पॉवर हिटर आवश्यक आहे.’ असं बिशप यांनी सांगितलं. IPL 2022 : ‘आम्ही मुर्खासारखं खेळलो’, लखनऊच्या विजयानंतरही राहुलचा राग अनावर ‘मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सनी या सिझनमध्ये निराशा केली असून त्यांनी महत्त्वाच्या क्षणी रन दिले आहेत. आता उर्वरित सामन्यांमध्ये मुंबईची टीम कसा खेळ करते तसंच या टीममधील काही खेळाडूंना ते आगामी सिझनसाठी कसं तयार करतात हे देखील पाहिलं पाहिजे,’ असं बिशप यावेळी बोलताना म्हणाले.