मुंबई, 21 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) बुधवारी आयपीएल 2022 मधील तिसरा विजय नोंदवला. दिल्लीनं पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 9 विकेट्सनं मोठा पराभव केला. दिल्लीच्या स्पिनर्सनी दमदार कामगिरी करत पंजाबला 115 रनवरच रोखले. त्यानंतर 116 रनचं आव्हान दिल्लीनं फक्त 10.3 ओव्हर्समध्ये एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीचा चायनामन बॉलर कुलदीप यादवला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कुलदीपनं 4 ओव्हर्समध्ये 24 रन देत 2 विकेट्स घेतल्या. कुलदीपनं यावेळी त्याचा पुरस्कार टीममधील सहकारी अक्षर पटेल (Axar Patel) सोबत शेअर केला. अक्षरनं 4 ओव्हर्समध्ये 10 रन देत 2 विकेट्स घेतल्या. कुलदीप यावेळी म्हणाला की, ‘मला हा पुरस्कार अक्षरसोबत शेअर करायचा आहे. त्यानं मिडल ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग केली आणि महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मी केजी (रबाडा) विरूद्ध बरंच खेळलो आहे. तो बॅटींग करताना पाय जास्त हलवत नाही हे मला माहिती होतं. चायमामन आणि गुगली बॉलिंग करण्याचा माझा प्लॅन होता. माझ्या दुसऱ्या विकेट्सचं श्रेय ऋषभ पंतला आहे. त्यानं मला राऊंड द विकेट बॉलिंग करायला सांगितलं. माझा रोल मला माहिती आहे. मी फक्त लाईन आणि लेन्थवर फोकस करत आहे.’ या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीच्या बॉलर्सनी पंजाबला 20 ओव्हरमध्ये 115 रनवर ऑल आऊट केलं. आयपीएलच्या या मोसमातला हा निच्चांकी स्कोअर आहे.दिल्लीकडून खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर मुस्तफिजूर रहमानला एक विकेट घेण्यात यश आलं. पंजाबकडून जितेश शर्माने 23 बॉलमध्ये सर्वाधिक 32 रन केले. IPL 2022: दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला? वाचा Inside Story पंजाबविरुद्धच्या या विजयासोबतच दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आली आहे. तर पंजाब सातव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर गेली आहे. दिल्लीने 6 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर पंजाबने 7 पैकी 3 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला.