मुंबई, 11 जानेवारी : भारतात 13 जानेवारी पासून पुरुष हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धा रंगणार आहे. यावर्षी भारतातील ओडिशा येथे या हॉकी विश्वचषकाचे सामने पारपडणार असून यात 16 देशाच्या संघानी सहभाग घेतला आहे. हॉकी विश्वचषक 2023 चा उदघाटन सोहोळा आज पारपडणार असून यात विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या सोहोळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज हजेरी लावणार असून त्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स देखील पहायला मिळतील. पुरुष हॉकी विश्वचषकाचा उदघाटन सोहळा ओडिशा येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या सोहोळ्याला सुरुवात होणार असून याला 40 हजार प्रेक्षक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. तसेच केवळ स्टेडियममधील लोकांनाच हा सोहळा पाहायला मिळणार नाही, तर शहराच्या 16 हॉकी फॅन पार्कमवर भव्य एलईडी स्क्रीनवर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता रणबीर सिंह आणि अभिनेत्री दिशा पठाणी धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर करण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : हॉकी वर्ल्ड कप शुक्रवारपासून; भारताचे सामने कधी, कुठे पाहता येणार? हॉकी विश्वचषक 2013 चे अधिकृत गीत “हॉकी है दिल मेरा” रचणारे लोकप्रिय संगीतकार प्रीतम हे 11 गायकांसोबत हे गीत सादर करणार आहेत. तसेच प्रसिद्ध बॉलीवूड गायक बेनी दयाल आणि नीती मोहन यांच्या रॉक आणि रोल संगीता सोहोळ्याला चारचांद लागणार आहे. सोबतच या कार्यक्रमात ओडिशा राज्यातील प्रतिभावान कलाकार देखील आपल्या कलांचे सादरीकरण करणार असून ओडिशाचे दिग्गज नृत्य कलाकार गुरू अरुणा मोहंती यांच्या नेतृत्वात एक सुंदर डान्स परफॉर्मन्स होणार आहे.
13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत 16 संघांमध्ये एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 19 जानेवारीपर्यंत गट सामने आणि 24 जानेवारीपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जातील. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा 29 जानेवारीला होणार आहे. 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारी रोजी इंग्लड सोबत होणार आहे. तर दुसरा सामना भारत विरुद्ध वेल्स यांच्यात 19 जानेवारीला होईल.