मुंबई, 14 जानेवारी : शुक्रवारी 13 जानेवारी रोजी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका आणि टी 20 मालिका खेळवण्यात येईल. परंतु या मालिकेसाठी संघात भारताचा स्टार फलंदाज आणि श्रीलंके सोबतच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा तारणहार ठरलेला के एल राहुल याचा समावेश करण्यात आलेला नाही. के एल राहुलला या सामन्यातून ड्रॉप करण्याचं कारण आता समोर आले आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत या दरम्यान के एल राहुलचा विवाह पारपडणार आहे. अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल हे दोघे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. गेल्यावर्षीपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र मध्यंतरी केएल राहुलवर झालेली शस्त्रक्रिया आणि विविध सामन्यांमुळे हे लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता अखेर 2023 च्या जानेवारी महिन्यात केएल राहुल बोहल्यावर चढणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोघे 23 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. बीसीसीआयने देखील कौटुंबिक कारणामुळे के एल राहुल हा न्यूझीलंड विरुद्धच्या भारतीय संघाचा भाग नसेल असे स्पष्ट केले आहे. हे ही वाचा : Under 19 WC : महिलांचा टी20 वर्ल्ड कप उद्यापासून, भारताची मॅच कधी? जाणून घ्या सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारीच्या 21 ते 23 तारखेपर्यंत के एल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नसोहोळ्यातील कार्यक्रम होणार आहेत. यात मेहेंदी, संगीत आणि हळदी या समारंभाचा देखील समावेश असेल. खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर या दोघांचा शाही विवाह सोहोळा होणार असून यात बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.