JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Tulsi Vivah 2022: शाळीग्राम आणि तुळशीचं लग्न का केलं जातं? यामागील पौराणिक कथा माहिती आहे का?

Tulsi Vivah 2022: शाळीग्राम आणि तुळशीचं लग्न का केलं जातं? यामागील पौराणिक कथा माहिती आहे का?

अध्यात्मिकदृष्ट्या याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये तुलसीविवाहासंबंधी अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर : जीवनात सुख-समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काही जण विशेष पूजा-विधी करतात. नुकतीच दिवाळी संपली आहे. आता सगळ्यांना तुलसीविवाहाचे वेध लागले आहेत. तुलसीविवाहाच्या मुहूर्ताच्या काळात सुख-समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला तुळशीची विधीवत पूजा करतात. या दिवशी शाळिग्राम आणि तुलसीमातेचा विवाह लावला जातो. शाळिग्राम हे भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. दर वर्षी कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपासून तुलसीविवाहाचा काळ सुरू होतो. तो सहसा त्रिपुरारी पौर्णमेपर्यंत असतो. आध्यात्मिकदृष्ट्या याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये तुलसीविवाहासंबंधी अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. `नयी दुनिया डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दिवाळी संपल्यानंतर तुळशीच्या लग्नाचे म्हणजेच तुलसीविवाहाचे वेध लागतात. तुळशीच्या लग्नाच्या अनुषंगाने अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. यापैकी एका कथेनुसार, एका कुटुंबात नणंद-भावजय राहत होती. त्यात नणंद अविवाहित होती आणि ती तुळशीची मनोभावे सेवा करत होती. ही गोष्ट भावजयीला मान्य नव्हती. ‘तुझा विवाह झाल्यावर तुला तुळसच खायला देईन किंवा हुंडा म्हणून तुळस देईन,’ असं ती चिडून नणंदेला म्हणत असे. यशावकाश नणंदेचं लग्न झालं. नणंदेच्या विवाहावेळी वरातीसमोर भावजयीनं तुळशीचं भांडं फोडलं; पण देवाच्या कृपेनं ते भांडं स्वादिष्ट पदार्थांनी भरलं. दागिने म्हणून भावजयीनं नणंदेला तुळशीच्या मंजिरी घातल्या होत्या. या मंजिरींचं दागिन्यांमध्ये रूपांतर झालं. कपड्यासोबत त्यावर तुळशीचं जानवं ठेवलं होतं. त्यामुळे त्या वस्त्रांचं रूपांतर रेशमी वस्त्रांमध्ये झालं. हे सर्व पाहून भावजयीला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिला तुळशीच्या पूजेचं महत्त्व लक्षात आलं. तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय; वैवाहिक आयुष्यातील समस्या होतील दूर नारद पुराणानुसार, राक्षसांचा राजा जालंधर याच्या अत्याचारांमुळे ऋषी-मुनी, देवता आणि माणसं त्रस्त झाली होती. तो खूप पराक्रमी आणि बलाढ्य होता. त्याची पत्नी वृंदा पतिव्रता होती आणि तिच्या पुण्याचं फळ म्हणून जालंधर कधीच पराभूत होत नव्हता. जालंधरच्या त्रासाला कंटाळून सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले आणि त्याला हरवण्याचा पर्याय विचारला. तेव्हा विष्णूने वृंदाचा पतिव्रता धर्म खंडित करण्याविषयी सांगितलं. भगवान विष्णूंनी जालंधराचं रुप घेऊन वृंदाला स्पर्श केला. त्यामुळे तिचं व्रत भंग झालं आणि जालंधर युद्धात मारला गेला. भगवान विष्णूंचं कपट आणि पतीच्या निधनामुळे वृंदा दुःखी झाली. तिने भगवान विष्णूंना ‘तुमच्या पत्नीचं कपटानं हरण होईल किंवा तुम्हालादेखील पत्नीवियोग सहन करावा लागेल,’ असा शाप दिला. शाप दिल्यानंतर वृंदा आपल्या पती जालंधरसोबत सती गेली आणि तिच्या राखेतून तुळशीचं रोप उगवलं. वृंदेचा पतिव्रता धर्म तोडल्याने भगवान विष्णूंना खूप अपराधी वाटलं आणि ‘तू तुळशीच्या रूपात सदैव माझ्यासोबत राहशील’ असा आशीर्वाद विष्णूंनी वृंदाला दिला. ‘कार्तिक शुक्ल एकादशीला शाळिग्राम स्वरूपात माझा विवाह तुळशीसोबत करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील,’ असं भगवान विष्णूंनी सांगितलं. त्या वेळपासून तुळशी विवाहाची प्रथा सुरू झाली, असं म्हणतात. तिसऱ्या एका पौराणिक कथेनुसार, एका तुलसीमातेनं नाराज होऊन भगवान विष्णूंना ‘तुम्ही काळा दगड व्हाल,’ असा शाप दिला. त्यानंतर या शापापासून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंनी शाळिग्राम दगडाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीसोबत विवाह केला. तेव्हापासून शाळिग्राम आणि तुलसीविवाह एक सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. तुलसीमातेला लक्ष्मीचा अवतार मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या