मुंबई, 29 ऑक्टोबर : हिंदू धर्मातील जवळपास प्रत्येक घरात सकाळ-संध्याकाळ पूजा केली जाते. पूजेमध्ये दिवा लावणे महत्त्वाचे मानले जाते. दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करते, कारण दिवा हा सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानला जातो. दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. दिव्याच्या वर जळणारी ज्योत प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. दिवा लावताना विशेष मंत्राचा जप केल्याने फायदा होतो, असे मानले जाते. तो कोणता मंत्र आहे? भोपाळमध्ये ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सांगत आहेत. दिवा लावण्याचे महत्त्व - हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यासाठी मंत्रांचा जप केला जातो. कोणतेही शुभ कार्य करताना या मंत्रांचा जप करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. तसेच संध्याकाळी घरात दिवा लावण्यासाठी पुराणात काही मंत्र सांगितले आहेत. असे मानले जाते की, या मंत्रांचा जप केल्याने जीवनात व्यक्तीला लाभ होतो. दिवा लावताना हा मंत्र वाचा शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोस्तुते।। दीपो ज्योति परंब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:। दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते।।
मंत्र जपण्याचे फायदे - हिंदू श्रद्धेनुसार दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास कोणत्याही मनुष्याला लाभ होतो. या मंत्राचा अर्थ असा आहे की, जो दिवा आपण लावतो तो आपल्याला शुभ, कल्याण, आरोग्य देतो, रोग नष्ट होतात आणि दिवा लावल्याने धन-संपत्ती वाढते. आमचे जे शत्रू आहेत त्यांच्या बुद्धीचा अंत होवो. त्यांना चांगली बुद्धी मिळो आणि ब्रह्मदेवाच्या रूपातील हा दिवा माणसाच्या पापांचा नाश करतो. हे वाचा - दिवा विझणं खरंच अपशकुन आहे का? पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)