एका अनोख्या प्रेमाची घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. (File Photo)
पुणे, 22 ऑगस्ट: ‘खरं प्रेम म्हणजे काय?’ याच्या प्रत्येकाच्या आपापल्या काही व्याख्या असू शकतात. अशीच एका अनोख्या प्रेमाची घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. पंजाबमधील अटारी सीमा सैन्यदलात कुली असणाऱ्या एका तरुणाची पत्नी पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. संबंधित तरुणानं आपल्या पत्नीला शोधण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली. पण पत्नीचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याला दुसऱ्या लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. पण आपली पत्नी कधी ना कधी तरी सापडेल, या आशेपोटी संबंधित तरुणानं लग्न करण्याचं टाळलं. अखेर पाच वर्षानंतर आपली पत्नी पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयाच असल्याचं कळताच पतीचा जीवात जीव आला. त्यानं तातडीन पुणे गाठत आपल्या पत्नीची भेट घेतली. याठिकाणी पत्नीला पाहून संबंधित तरुणाला आपल्या अश्रूंचा बांध आवरता आला नाही. पाच वर्षानंतर पत्नीला भेटण्याचा शुक्रवारचा अविस्मरणीय होता. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. हेही वाचा- पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पिता-पुत्रांना अखेर अटक, अघोरी प्रयोगाने पत्नीचा छळ सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, अमनसिंग असं संबंधित तरुणाचं नाव असून तो पंजाबमधील अटारी सीमा सैन्यदलात कुलीचं काम करतो. त्याची पत्नी पाच वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. खरंतर, अमनसिंग यांच्या पत्नी अमृतसरमध्ये असतानाही मानसिक आजारावर उपचार घेत होत्या. दरम्यान त्यांच्या आईच्या निधनानं त्यांच्यावर मोठा आघात झाला. यातूनच त्या एका अज्ञात रेल्वेत बसून अचानक घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर पतीनं आणि नातेवाईकांनी त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण त्यांचा काहीही ठावठिकाणा सापडला नाही. हेही वाचा- पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू दरम्यान, पालघर पोलिसांनी संबंधित महिलेला ठाणे मनोरुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी संबंधित महिलेला येरवडा येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी समाजसेविका प्रविणा देशपांडे यांनी संबंधित महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या फौजी, कुली अटारी अशा शब्दांचा उच्चार करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर प्रविणा यांनी अमृतसर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली आणि अमनसिंगला आपल्या हरवलेल्या पत्नीचा ठावठिकाणा समजला. अमनसिंग यांना बुधवारी आपल्या पत्नीबद्दल कळाल्यानंतर त्यांनी त्वरित पुणे गाठलं आहे. यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. अमनसिंग यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.