आज हवामान खात्यानं राज्यात पाच जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
पुणे, 25 जुलै: मागील चार पाच दिवसांपासून पुण्यासह (Pune) घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर मान्सूनच्या पावसानं थैमान (heavy rainfall) घातलं आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो जनावरं दगावली आहे. सलग काही दिवस जलप्रकोप केल्यानंतर आज कोकणाला पावसानं दिलासा दिला आहे. आज कोकणातील भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पण घाट परिसरात आजही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात आज चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. आज पुणे, सातारा, नाशिक आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात अतिमुसळधार तर नाशिक, जळगाव, पुणे, सातार आणि घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांत आज पावसानं उसंत दिली असून रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हेही वाचा- कोकणवासियांवरचं संकट कायमचं टळणार; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय पुढील आठवडाभर कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन चार दिवसांत कोकणातील पूर परिस्थिती नियंत्रणात येऊन जनजीवन सुरळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा- सांगलीकरांना मोठा दिलासा, बघा सांगलीतील महापुराचे LIVE VIDEO पुढील दोन आठवडे राज्यात पावसाचा ब्रेक? भारतीय हवामान खात्यानं नुकतंच पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या अनुषंगानं चालू आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण आणि घाट परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे. यानंतर आता पुढील दोन आठवडे राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर चौथ्या आठवड्यात पुन्हा देशात पावसाची वापसी होण्याची शक्यता आहे.