मुंबई, 18 जून : स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल होण्याचं स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील लाखो मुलं जीवापाड मेहनत घेत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक घटकांप्रमाणेच विद्यार्थ्यांवरही परिणाम झाला. कोचिंग क्लासेस आणि शहरं सोडून अनेक विद्यार्थी पुन्हा गावाकडे दाखल झाले. लॉकडाऊनचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने एक नवं आव्हान ठरत आहे. मात्र त्याचवेळी ही एक संधीही आहे. प्रशिक्षण काळातच अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि सध्या दौंडच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या IPS अधिकारी ऐश्वर्या शर्मा या ‘न्यूज18 लोकमत’च्या फेसबुक पेजवरून संध्याकाळी 5 वाजता तरुणांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी त्या परीक्षेआधी अभ्यासाची दिशा काय असावी, तसंच प्रशासकीय सेवेतील कामाचा अनुभव याविषयी भाष्य करतील. अवैध धंद्यांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या ऐश्वर्या शर्मा यांचा आतापर्यंतचा प्रवास ऐश्वर्या शर्मा या 2017 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून सुरुवातीच्या काळात त्यांची कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्याचवेळी एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या शर्मा यांच्यासह त्यांच्या टीमवर मटका व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने आणि जमावाने हल्ला चढवला होता. त्यानंतर शर्मा यांनी कंण्ट्रोल रूमला याबाबतची माहिती दिली आणि काही क्षणांत पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आणि शर्मा यांच्यासह संपूर्ण टीमची सुटका झाली. या घटनेच्या आठवणी सांगताना आता ऐश्वर्या शर्मा म्हणतात, ‘आपली टीम आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची हे या घटनेनंतर माझ्या लक्षात आलं. तसंच या घटनेवेळी माझे सर्व सहकारी माझ्यासोबत उभे होते, याचा मला अभिमान वाटला. मात्र या घटनेतून मी एक शिकले की, एखादी धाड टाकताना तुमच्यासोबत योग्य प्रमाण पोलीस फौजफाटा असायला हवा. तसंच एखाद्या ठिकाणी जाताना तिथल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत असायला हवी.’ “अवैध धंद्यांवर आतापर्यंत 40 हून अधिक छापे” प्रशिक्षण कालावधीतच झालेल्या हल्ल्यानंतरही मी थांबले नाही. त्या घटनेनंतरही आतापर्यंत विविध ठिकाणी मी 40 ते 50 छापे टाकले आहेत, अशी माहिती ऐश्वर्या शर्मा यांनी दिली. तसंच आपण काम करताना कोणत्याही दबावाचा विचार करत नसल्याचं त्या सांगतात. तरुणांच्या प्रश्नांना मिळणार थेट उत्तरे न्यूज18 लोकमतच्या फेसबुक पेजवरून होणाऱ्या लाईव्ह चर्चेदरम्यान ऐश्वर्या शर्मा या विद्यार्थी आणि तरूणांनी अभ्यास आणि प्रशासकीय सेवेतील करिअरविषयी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देतील. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खास संधी असणार आहे.