जातपंचायतीच्या आदेशानंतर संबंधित कुटुंबाचा मागील पावणे तीन वर्षांपासून छळ सुरू होता.
पुणे, 03 सप्टेंबर: कौटुंबीक वादानंतर न्यायालयातून घटस्फोट घेणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. जातपंचायतीऐवजी न्यायालयातून घटस्फोट (Get Divorce from Court) घेतल्यानं पुण्यातील (Pune) वाकड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा (social exclusion) सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जातपंचायतीच्या आदेशानंतर संबंधित कुटुंबाचा मागील पावणे तीन वर्षांपासून छळ सुरू होता. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर जात पंचायतीच्या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. वाकड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? 2013 साली 33 वर्षीय फिर्यादी सीताराम कृष्णा सागरे यांचा शीतल भोरे नावाच्या युवतीशी विवाह झाला होता. दरम्यान काही वर्षे सुखात संसार केल्यानंतर, त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. अनेक छोट्या मोठ्या कारणातून नवरा बायकोत वाद होऊ लागला. यातूनच मार्च 2018 साली शीतल या माहेरी निघून गेल्या. यानंतर काही दिवसांनी शीतल यांनी पतीपासून विभक्त होण्यासाठी कौटुंबीक न्यायालयात दावा दाखल केला. हेही वाचा- बेपत्ता असणाऱ्या दीर-भावजयीचा हृदयद्रावक शेवट; धक्कादायक घटनेनं यवतमाळ हादरलं पण जात पंचायतीऐवजी कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केल्यानं, जात पंचायतीतील सदस्यांचा स्वाभिमान दुखावला. यामुळे त्यांनी जात पंचायतीकडून आदेश काढून सागरे कुटुंबावर बहिष्कार घातला. तसेच सागरे कुटुंबासोबत कोणीही संबंध ठेवू नये. या नियमाचं उल्लंघन केल्यास त्यांनाही वाळीत टाकू असं फतवा जात पंचायतीनं काढला. त्यामुळे मागील पावणे तीन वर्षांपासून सागरे कुटुंबीयांना समाजातील, नात्यातील सुख दु:खाच्या प्रसंगात सहभागी करून घेतलं जात नव्हतं. हेही वाचा- आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं;थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या घटनेचा पाठपुरावा केला. त्यानंतर फिर्यादी सीताराम सागरे यांच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी जात पंचायतीतील 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. जातपंचायतीचे पाटील व पंच म्हणून मुलीचे आजोबा आणि मामा काम पाहत असून मुलीला बहिष्कृत केल्यानं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.