देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.
पुणे, 23 मे : ‘कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत आपण केलेल्या टेस्टिंग लॅबच्या मागणीवर सकारात्मक पावले उचलायला सुरुवात झाली असून पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ससूनमध्ये नव्याने टेस्टिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे. याचा फायदा पुणे शहराची टेस्टिंग क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे,’ अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या होण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर महापौर म्हणाले की, ‘याबाबतच्या तांत्रिक प्रक्रियाही वेगाने पूर्ण केल्या जाणार असून निधी राज्यसरकार आणि आपली पुणे महापालिका उभारणार आहे. नव्या टेस्टिंग लॅबची मागणी आणि सद्यस्थितीत यावरही बैठकीत पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.’
पुण्यात काय आहे कोरोनाची स्थिती? - दिवसभरात 205 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात 92 रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात सात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. - 170 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 42 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4603 (डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-4175 आणि ससून 428) - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1892 - एकूण मृत्यू -248 -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 2463. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 1723. दरम्यान, सुरुवातीच्या काळात मोठ्या मेहनतीने कोरोनाला रोखणाऱ्या जनता वसाहतीत आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या वसाहतीत 14 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर मागील 9 दिवसांत या भागातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. एकीकडे, मुंबईत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाने आपले पाय घट्ट केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यानंतर आता पुण्यातीलही झोपडपट्टीत कोरोनाबाधितांची होत असलेली वाढ चिंतेचा विषय आहे. संकलन, संपादन - अक्षय शितोळे