पुणे, 02 मार्च : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासून कसबा पेठची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे बोलले जायचे. यामुळे अवघ्या राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीमध्ये धंगेकर यांचा 10 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. दरम्यान यावर धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी धंगेकर म्हणाले की, मला साथ दिलेल्या सगळ्या मतदारांचा मी पहिला आभारी आहे. त्यांच्यामुळे मी ही निवडणूक जिंकू शकलो असे ते म्हणाले. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादांनी माझी निवडणुक हातात घेतली होती यामुळे मला अनेक गोष्टी सोप्या झाल्या. याचबरोबर मोहन जोशींनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केलं यामुळे ही निवडणूक सोपी होत गेली.
माझ्या विजयात महत्वाचा वाटा असलेल्या ठाकरे गटातील शिवसैनिकांचे मोठं काम आहे. ठाकरे गटाचे प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांची झालेली मोठी सभा आम्हाला खूप काही मिळवून दिल्याची भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. हा विजय महाविकास आघाडीच्या विकासाची नांदी असल्याचेही धंगेकर म्हणाले.
शरद पवारसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो. या वयात तीन सभा पवार साहेबांनी घेतल्या त्यांनी सगळी ताकद माझ्या मागे लावली होती. अजितदादांचा मला रोज फोन यायचा आज पण दादांनी फोन केला. लई जोरात बाईट देऊ नको हळू दे असे ही ते म्हणाले.
मी मुळचा बारामतीचा पवारांनी मुलगा म्हणून केलेल प्रेम विसरणार नाही. मी बापटसाहेबांना भेटायला जाणार आहे. माझे संस्कार असल्याने त्यांचे मी आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. कसब्यात पैशाचा धूर झाला पण त्यात भाजप आणि शिंदे गट खाक झाले. ही निवडणूक चुकीच्या पध्दतीने हाताळली गेली आहे.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका, अश्विनी जगताप विजयीनिवडणुक हुकूमशाहीकडे नेण्याच काम भाजपने केले आहे. शिवसेना कार्यालय टिळक वाडा मग कसबा गणपतीची आरती करून बापट साहेबांना भेटायला जाणार असल्याची माहिती धंगेकर यांनी दिली.