पुणे, 28 एप्रिल : कोरोनासारख्या जीवघेण्या माहामारीचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही विनाकारण घराबाहेर पडण्याची परवाणगी नाही. टवाळक्या करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. पण पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पोलिसांनाच मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. काल दुपारच्या सुमारास पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्याचदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काळेवाडी इथल्या मशिदीजवळ या प्रकरणातील आरोपी युनूस आतार हा विनाकारण फिरत होता. पथकातील पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी त्यास घरी जाण्यास सांगितलं. पण युनूसने काहीही न ऐकताच त्यांच्यात वाद सुरू झाला. या रागातून युनूस आणि त्याच्या दोन मुलांनी मतीन आणि मोईन यांनी आपसात संगनमत करून कळकुटे यांना मारहाण केली.
यानंतर पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, युनूस गुलाब आत्तार, मतीन युनूस आत्तार आणि मोईन युनूस आत्तार हे काळेवाडी परिसरात राहणाऱ्या या तिघांविरुद्ध भारतीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, त्याच बरोबर साथीचे रोग अधिनियमातील कलमानुसार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी मतीन हा रेल्वे पोलीस कर्मचारी आहे. असं असूनदेखील तो लॉकडाऊनच्या या काळातील आपले कर्तव्य विसरून अशा प्रकारे एका पोलीस कर्मचाऱ्याशीच हुज्जत घालून त्यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये सामील झाल्यानं या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संपादन - रेणुका धायबर