पुणे, 28 मे: देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) शिरकाव झाल्यापासून वैद्यकीय क्षेत्रातील काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. अगदी 4 ते 5 किमी अंतर जाण्यासाठीही रुग्णवाहिकांकडून हजारो रुपये आकारले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालकाकडून जास्तीचे पैसे आकारल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रुग्णवाहिकांचे नवे दर नुकतेच निश्चित केले आहेत. ठरवून दिलेल्या दरापेक्षा आगाऊ पैसे आकरल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रुग्णवाहिकांचे नवीन दर शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी फ्लेक्सच्या स्वरूपात रुग्णालयाच्या आवारात लावावेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी दिला आहे. हे फ्लेक्स नागरिकांना सहज दिसतील अशा ठिकाणी लावण्याची अटही आरटीओ घातली आहे. त्याचबरोबर ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा आकारणी केल्यास नागरिकांनी rto.12-mh@gov.in किंवा homebranchpune@gmail.com वर संपर्क साधावा, असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, रुग्णवाहिकांना पहिल्या दोन तासांसाठी अथवा 25 किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार, 600 ते 950 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 12, 13 किंवा 14 रुपये आकारावेत, असा आदेश आरटीओकडून देण्यात आला आहे. हे ही वाचा- रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी बिल पालिकेला पाठवा, नवी मुंबई महापालिकेचे आदेश त्याचबरोबर रुग्णाला घेऊन जाण्यापूर्वी प्रतीक्षा करावी लागली तर, प्रतीक्षा शुल्क म्हणून प्रतीतास 100, 125 आणि 150 रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा सक्त इशारा देखील आरटीओकडून देण्यात आला आहे.