JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यपाल किल्ले शिवनेरीवर, पायी चालत करणार गडाची पाहणी

20 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यपाल किल्ले शिवनेरीवर, पायी चालत करणार गडाची पाहणी

किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर ते पायी फिरून पाहणी करणार असून 3 तास ते गडावर असतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जुन्नर, 16 ऑगस्ट : अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या शिवजन्मभूमीत अर्थात किल्ले शिवनेरीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सकाळी भेट देणार आहेत. गेल्या दोन दशकांत प्रथमच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी ते नतमस्तक होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर ते पायी फिरून पाहणी करणार असून 3 तास ते गडावर असतील. राज्यपालांच्या किल्ले शिवनेरीवरील भेटीच्या शासकीय नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने गडावरील राज्यपालांच्या भेटीच्या दृष्टीने विशेष खबरदारी प्रशासन घेत आहे. पावसामुळे कोणत्याही प्रकारची अडथळा राज्यपालांच्या दौऱ्यात किल्ले पाहणीच्या वेळात येवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. गडावर बिबट्यांचा वावर असतो. या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात यावी. झाडाझुडूपात हिंस्त्रपशू थांबणार नाहीत याची काळजी संबंधित विभागांनी घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दौऱ्याच्या अनुषंगाने देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाकडून या दौऱ्याचे नियोजन केले आहे. गेल्या 20 वर्षांत राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी भेटीची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे. या दौऱ्यासाठी राज्यपाल सकाळी 8 वाजता राजभवन येथून मोटारीने जुन्नरकडे निघणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता अवसरी खुर्द येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाम येथे थांबणार असून त्यानंतर जुन्नरकडे रवाना होतील. जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाम येथे येवून ते किल्ले शिवनेरीवर जातील. किल्ले शिवनेरीवर 3 तास भेटीच्या दौऱ्यानंतर ते राजभवनाकडे रवाना होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या