पुणे, 7 जानेवारी : फ्रान्समध्ये विदेशी भाषांचा शिक्षक असलेला 34 वर्षीय तरुण अलेक्झांडर फिरीयानोव्ह हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. तो सायकलवारी करत भारतातील लोकसंस्कृती अनुभवत आहे. तो सध्या महाराष्ट्रात आहे. शिवरायांनी उभारलेल्या गडकोटांना भेट देत त्याचा दौरा सुरू आहे. यावेळी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून तो थेट किल्ले शिवनेरीवर आला आणि राजांच्या चरणी लिन झाल्याचं पहायला मिळालं. सायकलप्रेमींकडून स्वागत अलेक्झांडर फिरीयानोव्ह जेव्हा शिवनेरीवर आला तेव्हा तेथील सायकलप्रेमींनी त्याला खास मराठमोळी टोपी आणि शाल भेट देत त्याच स्वागत केलं. तसेच त्याला नारायणगावची प्रसिध्द मिसळ देखील खाऊ घातली. तो सध्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास करत असून, त्या निमित्तानं तो राज्यातील किल्ल्यांना भेटी देत आहे. याचबरोबर आपण भारतातील ग्रामीण संस्कृतीचा देखील अभ्यास करत असल्याचं अलेक्झांडर फिरीयानोव्ह याने सांगितलं.
दीड हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास मुंबई ते कन्याकुमारी असा सुमारे दीड हजार किलोमीटरपेक्षा अधित प्रवास करून तो भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणार आहे. भारतात येऊन येथील संस्कृती आणि लोकजीवनाबद्दल जाणून घेण्याची आपली खूप दिवसांची इच्छा होती. अखेर ती आज पूर्ण होत आहे, यामुळे आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया अलेक्झांडर फिरीयानोव्ह याने दिली. तो सायकलवरच आपला संपूर्ण प्रवास करणार आहे.