आरोपीनं कंपनीतील एका सहकारी कर्मचाऱ्याच्या लॉग इन आयडीचा वापर करत कंपनीच्या 3 कोटी 68 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे.
पुणे, 04 सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या पुण्यातील एका तरुणानं आपल्या एका सहकाऱ्याच्या लॉग इन आयडीचा (Log In ID) वापर करून कंपनीला करोडो रुपयांना चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं कंपनीतील 3 कोटी 68 लाख रुपयांचा अपहार (Fraud 3.68 Crore) केला आहे. या कोट्यवधी रुपयांतून त्यानं आलिशान कार, घर, दागिने घेऊन मजा केली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या (Accused Arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. आदित्य राजेश लोंढे असं कोट्यवधी रुपये अपहार करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील शिवाजीनगर परिसरात वास्तव्याला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार्थिक गणपथी ऊर्फ कार्थिक सुब्रमनीयन आणि इतर बँक खातेधारकांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. राहुल रतनलाल कौल (वय -41) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी आदित्यकडून मोबाईल, लॅपटॉप आणि आलिशान कार असा 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हेही वाचा- गळा दाबून गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ; मुंबईतील फौजदाराचं धक्कादायक कृत्य नेमका अपहार कसा केला? आरोपी आदित्य हा एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे. त्यानं कंपनीतील एका सहकारी कर्मचाऱ्याच्या लॉग इन आयडीचा वापर करत कंपनीच्या 3 कोटी 68 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. आरोपीनं संबंधित आयडीवरून 24 गैरव्यवहार केले आहेत. तसेच अपहाराची रक्कम आरोपीनं परदेशातील बँक खात्यात पाठवले आहे. त्यानंतर ते पैसे आरोपीनं आपल्या खात्यात वळवून घेतले आहेत. आरोपी कार्थिक याने आदित्यच्या बँक खात्यात एकूण 2 कोटी 37 लाख 87 हजार रुपये पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. हेही वाचा- एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं या अपहाराच्या रक्कमेतून आरोपी आदित्यानं आलिशान कार, फ्लॅट, दुचाकी आणि दागिने खरेदी केले आहेत. यामध्ये त्यानं 66 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू आलिशान कार विकत घेतली आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.