पुणे, 5 जुलै : कोरोनाच्या या महासंकटात अनेक उद्योगधंद्यांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या काळात अनेक यात्रा, सण, उत्सव रद्दही करण्यात आले. पुण्याची शान असलेला गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. जसा पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे, तसंच ढोल ताशा वादनही पुण्याची वेगळी ओळख आहे. पण यंदा सार्वजनिक गणेशमंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने यंदा गणेशोत्सवात ढोल ताश्यांचं वादन होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिन्याअगोदर पुण्यातील विविध ठिकाणी ढोल ताशा पथके आपापली तयारी करत असतात. पण यंदा कोरोनाच्या या महासंकटात व पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ढोल ताशा पथकांची तयारी बंद आहे. माणसांचं आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. रोज पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे. त्यामुळे यंदा ढोल ताशा पथकांच्या सरावाला सुरुवात होईल असं वाटत नाही. ढोल ताशा पथकांची भूमिका ही नेहेमी गणेश मंडळांना पूरक असते. प्रशासन, पोलीस आणि पुणे महापालिका जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. यंदा गणेशोत्सवात ढोल ताशा वाजण अवघड दिसत आहे, असं मत ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. पुणे शहरात 170 हून अधिक ढोल ताशा पथके असून 25 हजारहून अधिक या पथकात सभासद आहेत. विविध पथकात नवनवीन तरुण तरुणाई सभासद म्हणून येत असतात. पण यंदा या सर्व वादकांनी थांबावं व विचार करावा आणि नाविन्याचा शोध घ्यावा, असंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. बाँड वादकांचं जसं पोट वादनावर अवलंबून असते, तसं ढोल ताशा पथकांचा नसतं. परंतु पथकांना जे मानधन दिलं जातं त्यात पथकांचा खर्च वजा करता पथके सामजिक काम वर्षभर करत असतात. गेल्या सहा वर्षात 6 ते 7 कोटी पर्यंत या पथकांना मानधन मिळालं आहे. गेल्या वर्षी मिळालेलं मानधनातील उर्वरित रक्कम जी पथकांनी वादनासाठी ठेवली होती, ती त्यांनी या कोरोनाच्या महासंकटात लोकांना मदत करण्यासाठी वापरली आहे. त्यामुळे त्यांचा कोष रिकामा झाला आहे. त्यामुळे त्यांना आत्ता पुढच्या वर्षांपर्यंत थांबावं लागणार आहे, अशी माहितीही पराग ठाकूर यांनी यावेळी दिली. संपादन - अक्षय शितोळे