शिवनेरीवर शिवप्रेमींची गर्दी उसळली
रायचंद शिंदे, प्रतिनिधी जुन्नर, 19 फेब्रुवारी : राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी केली जात आहे. दरम्यान, शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना शिवनेरी किल्ल्यावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. किल्ले शिवनेरीवर हत्ती दरवाजा ते धान्य कोठार या मार्गावर मोठी गर्दी निर्माण झाली आहे. लांबच लांब रांगामुळे प्रसासनावर मोठा ताण आला आहे. चेंगराचेंगरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवनेरीवर शिवप्रेमींची गर्दी किल्ले शिवनेरीवर शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमी युवकांची शनिवारपासूनच मोठी गर्दी उसळली होती. रविवारच्या शिवजन्म सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी गडावर आले होते. जुन्नर नगरपालिकेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. निमगिरी येथील तळेश्वर आदिवासी लेझीम पथकाच्या प्रात्यक्षिकांनी शिवप्रेमींची मने जिंकली.
शिवनेरीवर शासकीय शिवजयंती किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिवजन्मोत्सवाची सुरुवात शिवनेरी किल्ल्यावरून झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. देवेंद्र फडणवीस सुद्धा याठिकाणी उपस्थित होते. नऊवारी नेसलेल्या कलाकारांनी यावेळी शिवरायांचा पाळणा गायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सुंदर फुलांच्या सजावटीत, पारंपरिक पद्धतीने अगदी विधिवत हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस या दोघांनीही पारंपरिक पगडी परिधान केली होती.