मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
मुंबई, 26 जुलै : कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयातील ‘लिफ्ट’मध्ये बसविण्यात आलेल्या ‘फूट ऑपरेटेड’ तंत्रज्ञानाने यापूर्वीच अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. याच श्रृंखलेत आता ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयात ‘सेन्सर’ आधारित स्वयंचलित थर्मामीटर, सेन्सर व टायमर आधारित कार्य करणारे हात धुण्याचे मशीन, याच पद्धतीने काम करणारे सॅनिटायझर मशीन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजळ बसविण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर कार्यालयात येणारी प्रत्येक फाईल देखील प्रवेशद्वारावर असणा-या ‘अल्ट्रा व्हायलेट’ किरणांनी (यु.व्ही रेज) निर्जंतूक केली जात आहे. त्याचबरोबर कार्यालयात असणा-या प्रत्येक ‘बेसीन’चा नळ हा स्पर्शरहित पद्धतीने वापरता यावा, यासाठी या नळांना देखील सेन्सर बसविण्यात आले आहेत. तर कार्यालयातील शौचालयांमध्ये ऑटोमॅटिक सॅनिटायझर्स बसविण्यात आले आहेत, त्यामुळे ठराविक कालावधीनंतर शौचालय स्वयंचलित पद्धतीने सॅनिटाईज होत आहेत.यापैकी बहुतांश यंत्रांचे डिझाईन व निर्मिती महापालिकेच्याच अभियंत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली आहे. विशेष म्हणजे जी दक्षिण विभागातील या अभिनव प्रतिबंधात्मक उपाय योजना समजावून घेण्यासाठी गेल्या काही दिवसात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या विभाग कार्यालयाला अभ्यास भेटी दिल्या आहेत आणि या उपक्रमांचे कौतुक करत त्यांच्याही कंपन्यांमध्ये या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे; अशी माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे. प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ इत्यादी परिसरांचा समावेश असणा-या महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाची लोकसंख्या ही सुमारे 3 लाख 89 हजार इतकी आहे. या विभागाचे प्रशासकीय कार्यालय प्रभादेवी (पश्चिम) रेल्वेस्टेशन जवळील धनमिल नाक्याजवळ व ना.म.जोशी मार्गालगत आहे. याच विभाग कार्यालयाच्या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभिनव उपयोग करुन कोविड विषयक विविध प्रतिबंधात्मक बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व बाबी प्रामुख्याने विभाग कार्यालयात कार्यरत असणाऱ्या महापालिका अभियंत्यांच्या कल्पक पुढाकाराने प्रत्यक्षात आल्या असल्याचेही सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी आवर्जून नमूद केले आहे. महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची संक्षिप्त व मुद्देनिहाय माहिती पुढीलप्रमाणेः 1. मुख्य प्रवेशद्वारावर सेन्सर आधारित तपमान मोजणी : ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असणा-या सुरक्षा चौकीलगतच्या भिंतीवर ‘थर्मल स्कॅनर’ पद्धतीची तपमान मोजणी यंत्रे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बसविण्यात आली आहेत. या भिंतीवरील यंत्रासमोर उभे राहणा-या व्यक्तीच्या शरीराचे तपमान स्वयंचलित पद्धतीने मोजले जात आहे. तसेच हे तपमान निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्यास या यंत्रातून स्वयंचलितपणे ‘सायरन’चा (भोंगा) आवाज येतो. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला ताप असल्यास त्याची स्वयंचलित पद्धतीने पडताळणी होते. ज्यानंतर सदर व्यक्तीला पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पाठविले जाते. 2. स्वयंचलित हात धुण्याचे मशीन : ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ वैशिष्ट्यपूर्ण हात धुण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रांमध्ये ‘टायमर’ व ‘सेन्सर’ बसविण्यात आले असून यंत्राच्या खाली विशिष्ट अंतरावर हात नेल्यानंतर या यंत्रामधून सुमारे एक सेकंद एवढ्या कालावधीसाठी ‘हॅण्डवॉश लिक्वीड’ हातावर येते आणि त्यानंतर पाण्याचा फवाराही सुरु होतो. यामुळे कुठेही स्पर्श न करता व्यक्तीला त्याचे हात सुयोग्य प्रकारे धुता येतात. या यंत्रामध्ये देखील थर्मल स्कॅनर बसविण्यात आले आहे. ज्यामुळे हात धुणा-या व्यक्तीचे तपमान कळते व अधिक तपमान असणा-या व्यक्तीबाबत वरीलप्रमाणेच ‘सायरन’चा आवाज येतो. 3. स्वयंचलित सॅनिटायझर : वरील तपशीलाप्रमाणेच हात निर्जंतूक करण्यासाठी स्वयंचलित सॅनिटायझर यंत्राचा आणखी एक पर्यायही देण्यात आला आहे. या मशिनखाली विशिष्ट अंतरावर हात नेल्यास त्यातून सॅनिटायझर येते व हाताचे निर्जंतूकीकरण करता येते. 4. पिशव्या, फाईल इत्यादींचे यु. व्ही. रेजद्वारे निर्जंतुकीकरण : कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ यु. व्ही. रेजद्वारे (अतिनील किरणांद्वारे) निर्जंतुकीकरण करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. छोटेखानी डीप फ्रीजरच्या आकाराच्या असणा-या या यंत्रामध्ये फाईल, संदर्भ पुस्तकं, रजिस्टर, नोंदवह्या, सॅक बॅग इत्यादी वस्तू साधारणपणे ३० ते ६० सेकंद एवढ्या कालावधीसाठी ठेवून निर्जंतूक करण्यात येत आहेत. फाईल स्कॅनिंग साठी लवकरच आणखी एक अत्याधुनिक मशीन कार्यन्वित करण्यात येणार आहे. विभाग कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रांच्या परिसराला ‘स्क्रिनिंग झोन’ असे नाव देण्यात आले आहे. 5. कार्यालयातील बेसिनचे नळ सेन्सर आधारित : कार्यालयातील प्रसाधन गृहांमध्ये असणारे नळ हे देखिल ‘सेन्सर’ आधारित करण्यात आले आहेत. ज्यामुळे स्पर्श न करता आणि विशिष्ट अंतर ठेऊन नळाखाली हात नेल्यास पाण्याचा प्रवाह स्वयंचलितपणे सुरु होतो. 6. पेडल ऑपरेटेड ‘सोप डिस्पेन्सर’ व ‘सॅनिटायझर’ : कार्यालयाच्या आतील भागात विविध ठिकाणी व प्रसाधनगृहात पेडल ऑपरेटेड ‘सोप डिस्पेन्सर’ व ‘सॅनिटायझर’ बसविण्यात आले आहेत. ज्यामुळे हाताने स्पर्श न करता हात स्वच्छ करण्याची प्रक्रिया करता येऊ शकते. 7. शौचालयांमध्ये स्वयंचलित सॅनिटायझेशन मशीन : विभाग कार्यालयातील शौचालयांमध्ये स्वयंचलित सॅनिटायझेशन मशीन बसवण्यात आले आहे. यामुळे ठराविक कालावधीनंतर शौचालयांचे स्वयंचलित पद्धतीने सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. या अंतर्गत मशीन मध्ये पाच मिनिटांपासून तर दोन तासांपर्यंतचा कालावधी ‘सेट’ करण्याची सुविधा आहे. 8. पायाने उघडा दरवाजा : कार्यालयाच्या आतील भागात विविध ठिकाणी ये जा करताना दरवाजा प्राधान्याने पायाने ढकलावा अशा सूचना कर्मचारी व अभ्यागतांना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर दरवाज्यांच्या खालच्या बाजूला ज्याठिकाणी पायाने ढकलावयाचे आहे, त्याठिकाणी मेटल स्ट्रीप बसविण्यात आली आहे. 9. कार्यालयातील ‘लिफ्ट’मध्ये बसविण्यात आले ‘फूट ऑपरेटेड’ तंत्रज्ञान : जी दक्षिण विभाग कार्यालयातील लिफ्ट मध्ये नेहमीचे हाताने दाबावयाचे परंपारिक पद्धतीचे बटण न ठेवता त्याऐवजी पायाने दाबावयाचे वैशिष्ट्यपूर्ण खटके यापूर्वीच बसविण्यात आले आहेत. तर लिफ्टच्या बाहेर देखील लिफ्ट बोलावण्यासाठी असणारी बटणे देखील ‘फूट ओपरेटेड’ पद्धतीचीच बसविण्यात आली आहेत. लिफ्टची ही ‘फूट ऑपरेटेड’ बटणे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या औत्सुक्याचा आणि अनुकरणाचा विषय ठरत आहेत.