मुंबई, 12 एप्रिल : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कुप्रसिध्द असणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ते सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले आहेत. या ट्वीटमध्ये व्याकरणाची तर बोंब आहेच पण त्याबरोबर स्पेलिंग देखील समजणं कठीण आहे. यामध्ये त्यांनी India ची स्पेलिंग Endia लिहिली आहे तर pandemicची स्पेलिंग pendamic! एकंदरीत ट्रोल होण्यासारखे ट्वीट केल्यामुळे भारतातूनच नव्हे तर जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी याही आधी भारतावर टीका करताना अशाच प्रकारे चुकीच्या शब्दांचा वापर केल्याने अनेकदा ते टीकेचे धनी झाले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी आणखी काही चुका केल्या आहेत. जसं की Operation ऐवजी Opression आणि Because ऐवजी becauuse असं लिहिलं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हे मंत्री महोदय पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. आपल्या ट्वीटमधून त्यांनी मोदी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या ट्वीटनंतर झालं भलतच आहे. ट्रोलिंगची शिकार झालेल्या या मंत्री महोदयांना भारतीयांनी आपल्या खास शैलीतून चोख उत्तर दिले आहे.
नेमका या ट्वीटचा अर्थ लावणं जरा कठीण आहे पण त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी #ModiGovtFailsIndia असा हॅशटॅग देखील वापरला आहे. पण ट्वीटर युजर्सनी त्यांना व्याकरण आणि स्पेलिंग शिकण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी असं म्हटलं आहे की चौधरी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान हे खातं अशासाठी देण्यात आलं आहे कारण त्यामध्ये काही काम नसतं. आणखीही काही मजेशीर कमेंट्स भारतीयांनी केल्या आहेत. नेमकं मंत्रीजींना काय म्हणायचं आहे असा सवाल काही ट्वीटर युजर्सनी केला आहे.
या ट्वीटमुळे त्यांच्यावर खूप टीका होत आहे. भारतावर केलेली टीका त्यांच्यावरच उलटल्यासारखं झाले आहे.अनेकांनी त्यांना पुढच्या वेळी ट्वीट करताना अभ्यास करून येण्याचा सल्ला दिला आहे. संपादन- जान्हवी भाटकर