मुंबई, 18 ऑगस्ट : येत्या 21 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) हिंदी चित्रपट CLASS OF -83 प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. कारण या चित्रपटामुळे माजी पोलीस अधिकारी तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि शाहरुख खानच्या रेड चिली या कंपनीमध्ये जुंपली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी या चित्रपटाचे ओटीटी फ्लॅटफार्म असलेले नेटफ्लिक्स, रेड चिली प्रोडक्शन हाऊस आणि लेखक हुसेन जैदी यांना नोटीस पाठवली आहे. 2018 साली प्रदीप शर्मा हे पोलीस सेवेत असताना लेखक हुसेन जैदी हे त्यांना भेटले होते. या भेटी दरम्यान प्रदीप शर्मा यांच्याकडे हुसेन जैदी यांनी त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित ऑपरेशनच्या बाबतीतील माहिती व काही कागदपात्रांची मागणी केली होती. प्रदीप शर्मा यांनी दिलेली माहिती व कागद पत्रांच्या आधारावर हुसेन जैदी यांनी The untold story of encounter specialist Pradeep sharma नावाचे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या आधारावर काही काल्पनिक गोष्टी जोडत The Class of 83 हा चित्रपट बनविण्यात आला आहे. मात्र, प्रदीप शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, पुस्तकावर चित्रपट बनवण्यावर त्यांचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जात असेल तर ते चुकीचे आहे. यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रदीप शर्मा यांना दाखविण्यात यावा अशी मागणी प्रदिप शर्मा यांना नोटीसद्वारे केली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यास प्रदीप शर्मा हे विरोध करतील, असं या नोटीसमध्ये त्यांनी म्हटले आहे. एवढंच नाहीतर जर हा चित्रपट त्यांना दाखवला गेला नाही तर ते मुंबई उच्च न्यायालयात चित्रपटा विरोधात धाव घेतील. तसंच जर प्रदीप शर्मा यांना चित्रपट दाखवला गेला आणि त्यात प्रदीप शर्मा यांनी सुचवलेले बदल न करता तो प्रदर्शित केला तरीही प्रदीप शर्मा या चित्रपटाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दारं ठोठावतील. तर दुसरीकडे चित्रपट रिलीज होण्याआधी निर्माण केला गेलेला वाद हा चित्रपटाकडे लक्ष वेधून घेण्याकरता केलेली खेळी तर नाही ना अशी चर्चा देखील या वादामुळे रंगली आहे.