मुंबई, 21 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधिताची संख्या 52 वरून 63 वर पोहोचली आहे. या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणं संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आपण सध्या दुसऱ्या स्टेज मध्येच आहोत. पण परिस्थिती अशीच कायम राहिल्यास चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर पोहोचली आहे. मुंबईत 10 नवीन रुग्ण आढळले आहे. तर एक जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात 11 रुग्णांची वाढ झाली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. आतापर्यंत आढळलेल्या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणांना संर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. लोकल ट्रेनही बंद करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मत आहे. परंतु, अजून राज्य सरकारने तसा कोणताही निर्णय घेतला नाही. खबरदारी म्हणून जनतेने सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा, असं आवाहनही टोपे यांनी केलं. मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल. जर गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल बंद करावीच लागेल, असं स्पष्टपणे राजेश टोपे यांनी सांगितलं. कोरोनाचा विषाणू हा थंड ठिकाणी जास्त काळ जिवंत राहतो, असं तपासातून पुढे आलं आहे. त्यामुळे घरातील, ऑफिसमधील एसी बंद ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं. भारतात 8 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 89 वरुन 250! दरम्यान, भारतात गेल्या 8 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89 वरुन 250 पर्यंत पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयं, मंदिर, मशीद, गार्डन, जिमखाने बंद 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण गेल्या 8 दिवसांत वेगाने वाढल्याचं लक्षात आलं आहे. 13 मार्चला रुग्णांची संख्या 89 होती ती 24 तासांत 96 पर्यंत गेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहर लॉकडाउनच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्यापैकी अनेक शहरांमध्ये सरकारी वाहतूक वगळता दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.