प्रसिद्ध युट्यूबरचं निधन
मुंबई, 19 जुलै : गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रसिद्ध युट्युबर्सचा अकाली मृत्यू झाल्याच्या घटना कानांवर येत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या एका 22 वर्षांच्या युट्युबस्टारचा मृत्यू झाला. अॅनाबेल हॅम असं नाव असलेली ही तरुणी युट्युबच्या माध्यमातून दैनंदिन कॉलेज लाईफ चाहत्यांशी शेअर करण्यासाठी प्रसिद्ध होती. एपिलेप्टिक अॅटॅकमुळे (अपस्मार) तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. शनिवारी केनेसॉ स्टेट युनिव्हर्सिटीमधील तिच्या सोरॉरिटी चॅप्टरद्वारे तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. पण, त्यात मृत्यूच्या कारणाविषयी कोणताही तपशील उघड करण्यात आलेला नाही. अॅनाबेल हॅमचे युट्युबवर 77 हजार सबस्क्रायबर्स होते. याशिवाय, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे 107,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. सोशल मीडियावर ती ब्युटी टिप्स, दैनंदिन आयुष्यातील लहान-मोठ्या घटना आणि इतर अनेक बाबी पोस्ट करत असे. हेही वाचा - पहिला नवरा पायलट; 4 वर्षात तुटलं लग्न, शोएबवर जडलं प्रेम अन् नाव बदलून दीपिका कक्कडनं केलं होतं लग्न तिची बहीण अमेलियानं सोमवारी एका भावनिक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अॅनाबेलच्या निधनाच्या दुःखद बातमीला दुजोरा दिला. अमेलियानं लिहिलं, “कधीकधी देव असं का करतो हे मला समजत नाही. हे किती कठीण आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. जोपर्यंत असं काही प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत आपण त्याची कल्पनाच करत नाही.” अमेलियानं लोकांच्या पाठिंब्याबद्दल आणि दयाळूपणाबद्दल आभार मानले. अॅनाबेलची आणखी एक बहीण अलेक्झांड्रियानं देखील आपल्या बहिणीसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
काही आंतरराष्ट्रीय मीडिया आउटलेट्स, अलाबामा पोलिसांची एक पोस्ट आणि अॅनाबेलच्या मृत्यूचा संबंध जोडत आहेत. “आज दुपारी 3:32 वाजता फेअरहोप पोलीस विभागानं बेपत्ता व्यक्तीच्या कॉलला प्रतिसाद दिला जी फेअरहॉप येथे असलेल्या मोलोकाई लेनच्या शेवटी घाटावर चालताना दिसली होती. अलाबामा पोलीस आणि डॅफ्न सर्च अँड रेस्क्यू यांच्यासह फेअरहोप स्वयंसेवक अग्निशमन विभागानं मदतीसाठी प्रतिसाद दिला. तेव्हा ती व्यक्ती मृत अवस्थेत आढळली. या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. फेअरहोप पोलीस सध्या तपास करत आहेत आणि अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर अपडेट करतील,” अशी ही पोस्ट आहे. मात्र, ती अधिकृत आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. अॅनाबेल हॅमच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.