अहमदाबाद, 14 एप्रिल : देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येने 10000 टप्पा पार केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. अवघ्या सहा तासांपूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि काही मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यांच्या भेटीनंतर अवघ्या 6 तासांच्या कालावधीत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अहमदाबाद मिरर यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहेत. या घटनेनंतर प्रशासकीय हालचालींनी वेग घेतला आहे. यानंतर मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अद्याप याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. यापूर्वीही काही केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकप्रतिनिधी हे लोकांच्या संपर्कात असल्याने त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधार आल्यानंतर सध्या ते घरात क्वारंटाइनमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनाही घराबाहेर फिरताना आवर्जून मास्क घालणे आवश्यक आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात नियम कडक केले आहेत. संबंधित - राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 2684 वर, आज 350 रुग्णांची नोंद तापाच्या लक्षणांवर आता घरचे उपचार नकोत; पुण्याच्या अधिकाऱ्यांची कळकळीची विनंती