मुंबई, 14 एप्रिल : आज राज्यात 350 नवीन Covid - 19 रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णसंख्या 2684 वर पोहोचली आहे. दुसरीकडे चांगली बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील 259 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या राज्यात 2247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 46 हजार 588 नमुन्यांपैकी 42 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 2684 जणं पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यातून 259 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 178 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 11, पुण्यातील 4 तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.
18 deaths and 350 new #Coronavirus positive cases reported in Maharashtra today. Total number of cases stands at 2684 including 178 deaths and 259 recovered: State Health Department pic.twitter.com/Im3bpMMY5j
— ANI (@ANI) April 14, 2020
सध्या राज्यात 67 हजार 701 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून 5647 जणं संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6 , मुंबईत 14 तर प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर आणि अहमदनगर भागातील आहेत. तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथील तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 7 महिला आहेत. त्यातील 5 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 18 जणांपैकी 13 रुग्णांमध्ये ( 72 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता. संबंधित - तापाच्या लक्षणांवर आता घरचे उपचार नकोत; पुण्याच्या अधिकाऱ्यांची कळकळीची विनंती