काही मुलांना नासामध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्याचं सुशांतचं स्वप्न होतं. ज्याचा उल्लेख त्यानं त्याच्या कुटुंबीयांकडे आणि जवळच्या मित्रांकडे अनेकदा केला होता आणि या प्रोजेक्टवर तो काम सुद्धा करत होता.
राधिका रामास्वामी, मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर कला क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पवित्र रिश्ता सारखी प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका आणि अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. त्यामुळे सुशांतने हे पाऊल का उचललं याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 40 मिनिटापूर्वीच ही घटना घडली असून जेव्हा सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याचे काही मित्र त्याच्या घरी होते. त्याच्या घरातून काही वैद्यकीय कागदपत्र मिळाली असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सुशांतसिंह राजपूत हा तणावात असल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते. मात्र त्यादरम्यानच त्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलीस त्याच्या घरी असून पंचनामा सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं.
सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अगदी एकच आठवड्यापूर्वी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने तिच्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या बातमीनंतर सुशांतने Tweet करून भावना व्यक्त केल्या होत्या. ‘दिशाची बातमी हादरवून टाकणारी आहे. तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला माझ्याकडून भावपूर्ण सांत्वन’, असं त्यानं लिहिलं होतं. संपादन - अक्षय शितोळे