तिरुवअनंतपुरम, 19 फेब्रुवारी : केरळमध्ये (Keral) पुन्हा एकदा ‘बीफ’वरुन गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यातील पोलीस प्रशिक्षणार्थींच्या मेन्यूमधून बीफ हटविल्याच्या बातमीमुळे केरळमधील राजकारण गरमागरम झालं आहे. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या मेन्यूमधून बीफ (Beef) हटविल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी आता कोझीकोड येथील मुक्कम पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. ते इतकंच करुन थांबले नाही तर पोलीस ठाण्यासमोर बीफ करी आणि ब्रेडचे वाटप केले. मुख्यमंत्री पिनराई विजयन आरएसएसच्या (RSS) समोर झुकत आहेत, असा आरोप केरळ प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिन के. प्रवीण कुमार यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पिनराई विजयन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर लोकनाथ बेहरा यांना पोलीस महानिदेशक बनविण्य़ात आलं, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री पिनराई हे केरळमध्ये आरएसएसचा एजेंडा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केरळ कॉंग्रेस संपूर्ण राज्यात पिनराई यांच्या दुहेरी वागणुकीचा खुलासा करेल. कॉंग्रेसच्या आरोपानंतरही केरळ पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की नव्या प्रशिक्षणार्थींच्या निर्धारित मेन्यूमधून बीफ हटविण्यात आलेलं नाही.
केरळ पोलिसांनी म्हणणे आहे की, जो मेन्यू दाखवून गोंधळ घातला जात आहे तो मेन्यू सरकारी रुग्णालयातील आहारतज्ज्ञांनी तयार केलेला आहे. मेन्यूमधून बीफ हटविण्यासंदर्भात पोलिसांकडून याव्यतिरिक्त अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वीही केरळ सरकारकडून बीफवर प्रतिबंध लावण्यात आला होता. मात्र राज्यात पिनराई विजयन यांची सत्ता आल्यानंतर प्रतिबंध हटविण्यात आले होते.