नवी दिल्ली, 13 जुलै : देवी-देवता, महापुरुष, विशिष्ट जाती-धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. या पूर्वी काही राजकीय नेते, सेलेब्रिटी यामुळे अडचणीत देखील आले आहेत. अशा प्रकारच्या नुकत्याच घडलेल्या घटनेत एक साधू अडचणीत आले आहेत. इस्कॉन अर्थात इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेसशी संबंधित साधू अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने इस्कॉनने त्यांच्यावर बंदी घातली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, साधू अमोघ लीला दास नेमके कोण आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. ` कोण आहेत साधू अमोघ लीला दास? 43 वर्षांचे अमोघ लीला दास हे एक साधू आहेत. तसेच ते मोटिव्हेशनल स्पीकर, आध्यात्मिक कार्यकर्ता, लाइफस्टाइल कोच आणि इस्कॉनच्या द्वारका चॅप्टरचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.ते गेल्या 12 वर्षांपासून इस्कॉनशी संबंधित आहेत. अमोघ दास यांचा जन्म लखनौमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव आशिष अरोरा असे आहे. ते सध्या दिल्लीत राहतात. मी लहानपणीच माझा आध्यात्मिक प्रवास सुरू केला असा दावा ते करतात. त्यांनी 2000 मध्ये इयत्ता 12 वीत असताना देवाच्या शोधासाठी घर सोडलं. इस्कॉनमध्ये सामील होण्यापूर्वी, 2004 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून सॉफ्टवेअर इंजिनीअरची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी यूएस बेस्ड बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनसाठी काम केले आहे. सोशल मीडियावर त्यांचे बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत. नेमकं घडलं काय? साधू अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर इस्कॉनने त्यांच्यावर बंदी घातली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या अन्नाच्या आवडीविषयी आणि रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणीबद्दल अमोघ दास यांनी अलीकडे एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्यावर धार्मिक क्षेत्रातील अनेक अधिकारी व्यक्तींनी टीका केली आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. यावरुन इस्कॉनने खेद व्यक्त करत त्यांना एका महिन्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये अमोघ लीला दास स्वामी विवेकानंद यांच्यावर मासे खाल्ल्याबद्दल टीका करताना आणि रामकृष्ण परमहंस यांच्या `जतो मत ततो पथ` म्हणजेच `जितकी मतं तितके मार्ग` या शिकवणीवर,सर्व मार्ग एकाच ठिकाणी नेत नाहीत असं म्हणत उपहासात्मक टीका करताना दिसत आहेत. UCC : ‘शरियत कायद्याने भारताचं विभाजन कसं केलं? हे भाजपने सांगावं’, गुरूमूर्तींची मागणी या संदर्भात इस्कॉनने एक निवेदन जारी केलं आहे. ``अमोघ लीला दास यांच्या विचारांशी आम्ही सहमत नाही. त्यांचे मत संस्थेच्या मूल्य आणि शिकवणीशी जुळत नाही,`` असं इस्कॉनने निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे. या विधानातून आमच्यापेक्षा वेगळ्या धार्मिक श्रद्धा आणि प्रथांबद्दल करण्यात आलेला अनादर किंवा दाखवलेली असहिष्णुता यांचा इस्कॉनने निषेध केला आहे. इस्कॉनने या अपमानास्पद विधानाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच जगातील विविध आध्यात्मिक मतं आणि त्यांचं आचरण करणारे यांबाबत अमोघ लीला दास यांना पुरेसं ज्ञान नाही असंही इस्कॉनने म्हटलंय. अमोघ लीला दास यांनी त्यांच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच मी गोवर्धन पर्वतावर जाऊन एक महिना प्रायश्चित करेन. तसेच सार्वजनिक जीवनापासून दूर राहीन असं वचन अमोघ दास यांनी दिलं आहे, असंही इस्कॉनने प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे. आम्ही इतर धार्मिक श्रद्धा किंवा प्रथांबद्दल कोणत्याही प्रकारचा अनादर आणि असहिष्णुतेचा निषेध करतो, असं इस्कॉनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमोघ दास यांनी केलेली चूक गंभीर असून त्यांच्या या चुकीची दखल घेत त्यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांना कळवण्यात आला आहे. अमोघ लीला दास यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी किती मोठी चूक केली आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. त्यांनी गोवर्धन पर्वतावर एक महिना प्रायश्चित करण्याचे निश्चित केले आहे आणि ते तत्काळ सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे अलिप्त होतील, असं निवेदनात नमूद आहे.