नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला 14 फेब्रुवारी 2020 ला एक वर्ष पूर्ण झालं. अनेकांनी विविध माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र या हल्ल्यातील शहीद जवानांचे कुटुंबीय अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील शहीद जवान विजय सोरेंग यांचे कुटुंबीय देखील सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शुक्रवारी या भ्याड हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिवशीच शहीद विजय सोरेंग यांच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्या रस्त्याच्या कडेला भाजी विकताना दिसत होत्या. त्यानंतर एका ट्विटर युजरने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना या ट्वीटमध्ये टॅग करत या गंभीर परिस्थितीकडे लक्ष घालण्याची विनंती केली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या ट्विटची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी लगेचच आणखी एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना टॅग केलं आहे. लवकरात लवकर या कुटुंबाकडे मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रशांत कुमार या ट्विटर युजरने त्यांचं या घटनेकडे लक्ष वेधलं होतं त्यांचे देखील सोरेन यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्याच्या आदेशाचं पालन करत जिलाधिकाऱ्यांनी शहीद विजय सोरेंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याचप्रमाणे शहीद सोरेंग यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात येईल असं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.
माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी शहीद विजय सोरेंग यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर झारखंडमधील सरकार बदललं तरी सुद्ध अद्याप त्यांना मदत पोहोचलेली नाही आहे. आज ट्विटरच्या माध्यमातून एक घटना पुढे आली आहे. केंद्र सरकार तसंच प्रत्येक राज्य सरकारने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.