TMC
दिल्ली, 18 एप्रिल : तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल रॉय बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांनी दावा केला की, सोमवारी सायंकाळी वडील कोलकात्याहून दिल्लीला जाणार होते. रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचलं पण वडिलांचा काही पत्ता नाही. माजी रेल्वे मंत्री असणाऱ्या मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु यांनी पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरापासून वडिलांची काही माहिती मिळालेली नाही, ते बेपत्ता आहेत. त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नाहीय. तृणमूल नेते मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा शुभ्रांशू यांच्यात रविवारी वाद झाल्याचंही म्हटलं जात आहे. पत्नीच्या निधनानंतर मुकुल रॉय यांना आरोग्याच्या समस्या आहेत. फेब्रुवारीत त्यांना रुग्णालयातही दाखल केलं होतं. शुभ्रांशूने असाही दावा केला की, कुटुंबिुयांनी एअरपोर्ट पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर पोलिसांच्या सूत्रांनी अशी तक्रार मिळाली नसल्याचं म्हटलंय. भाजपमधून दीड वर्षांपूर्वी मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यापासून फारसे सक्रीय दिसले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला लोकसभेत पश्चिम बंगालमधून १८ जागा जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता असं मानलं जातं. २०२१ च्या विधानसभेला ते कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र भाजपला निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरली. मुकुल रॉय बेपत्ता झाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काहींनी म्हटलं की, मुकुल रॉय यांनी कोलकाता विमानतळावर दोन दिग्गजांची भेट घेतली होती. कोलकाता एअरपोर्टवर ते पोहोचले होते. त्यानतंर ते कुठे गेले याची काहीच माहिती नाही.