सुई गाव
जगबीर घनघस, प्रतिनिधी भिवानी, 24 जून : गाव हा शब्द तुमच्या मनात आल्यानंतर मातीची घरे, छोट्या गल्ल्या आणि सोईसुविधा नसलेला परिसर असा विचार तुमच्या मनात आला असेल. मात्र, थांबा. कारण, एकाने यापेक्षा वेगळीच अशी आपली ओळख तयार केली आहे. या गावाच्या सौंदर्याची चर्चा केवळ देशाची राजधानी दिल्लीतही होत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रातही या गावाने नाव केलं आहे. मग हे गाव कोणतं, या गावाची विशेषत: काय आहे, हे जाणून घेऊयात. हे गाव हरयाणा राज्यात आहे. 2014 मध्ये हरियाणात पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्रीपदी मनोहर लाल खट्टर हे विराजमान झाले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी धनदांडग्यांनी आपले गावे दत्तक घेऊन त्यांना एक आदर्श गाव बनवण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमात भिवानीतील सुई गावचे सेठ कृष्णा जिंदाल हे सर्वप्रथम पुढे आले होते.
आपल्या दिवंगत आई महादेव यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या गावात कोट्यवधी रुपये खर्च करून गावाला अत्यंत सुंदर बनवले आहे. विशेष म्हणजे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः या गावाचे उद्घाटन करण्यासाठी येथे आले होते. इथे येऊन त्यांनी हरियाणाच्या या पहिल्या स्वयंप्रेरित मॉडेल गावाचे उद्घाटन स्वत:च्या हाताने केले होते. आज हे गाव देशभरात पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. सूई असे या गावाचे नाव आहे.
सेठ कृष्णा जिंदाल यांनी आपल्या गावात कोट्यवधी रुपये खर्चू करुन 7-8 मोठी उद्याने बांधली आहेत. तसेच एक मोठा तलाव बनवला आहे. यासोबतच 500 पेक्षा जास्त लोक बसण्याची क्षमता असलेले मोठे सभागृह बांधण्यात आले आहे. प्रत्येक गल्लीत पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच कृष्णा जिंदाल यांनी आपले गाव शहरापेक्षा स्वच्छ आणि सुंदर केले आहे. हरियाणात क्वचितच असे गाव असेल, जिथे एवढा मोठा तलाव, इतकी हिरवीगार उद्याने आणि प्रत्येक रस्ता इतका स्वच्छ, मजबूत असेल. या गावाविषयी ज्याला माहिती मिळाली असेल ते लोक इथे नक्की भेट देतात. आजूबाजूच्या परिसरासाठी तर हे गाव पिकनिक हब बनले आहे. दररोज शेकडो लोक आपल्या कुटुंबीयांसह आणि मुलांसह येथे भेट देण्यासाठी येतात. हरियाणा सरकारच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. आपले गाव ही आपली जबाबदारी आहे हे आपण समजून घेतले पाहिजे आणि पर्यावरणाप्रती आपली स्वतःची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. यामुळे प्रत्येक गावाला सुई गावासारखे बनवता येईल.