JOIN US
मराठी बातम्या / देश / या शाळेला रविवारी नाही तर सोमवारी सुट्टी, कारण वाचून वाटेल अभिमान!

या शाळेला रविवारी नाही तर सोमवारी सुट्टी, कारण वाचून वाटेल अभिमान!

देशभरातल्या सर्व शाळांना रविवारी सुट्टी असल्याचं सगळ्यांनाच माहिती असेल, पण भारतात अशीही एक शाळा आहे जी रविवारी सुरू असते, पण सोमवारी बंद असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पूर्व वर्धमान, 4 एप्रिल : पश्चिम बंगालमधल्या पूर्व वर्धमानमधल्या एका माध्यमिक शाळेला रविवारऐवजी सोमवारी सुट्टी असते. गेल्या 101 वर्षांपासून या शाळेत हा नियम पाळला जातो. इतर शाळा साधारणपणे आठवड्यातून सहा दिवस म्हणजेच सोमवार ते शनिवार सुरू असतात आणि रविवारी शाळांना सुट्टी असते; पण पूर्व वर्धमानमधली एक शाळा याला अपवाद आहे. पूर्व वर्धमानच्या जमालपूर भागात असलेल्या या शाळेचं नाव गोपाळपूर मुक्तकेशी विद्यालय असं आहे. हा नियम देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून पाळला जात आहे; पण या नियमामागे मोठा इतिहास आहे. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक देवव्रत मुखर्जी यांनी सांगितलं, की `या नियमाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्याशी निगडीत एका प्रसंगाचा या शाळेच्या स्थापनेशी संबंध आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर असहकार चळवळ सुरू होती. परदेशी वस्तूंवर बहिष्कार, परदेशी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार आणि परदेशी भाषांवर बहिष्कार टाकून देशी भाषांचा वापर करणं, देशी शिक्षणव्यवस्थेला प्रोत्साहन देणं असं या असहकार चळवळीचं मुख्य सूत्र होतं. त्या वेळी गांधीजींच्या असहकार चळवळीच्या विचारसरणीचा अंगीकार करणाऱ्या या गावातल्या एका प्रसिद्ध माणसाने स्वदेशी विचारधारेतून या शाळेची स्थापना केली. इंग्रजांनी नियमानुसार रविवारी आपली कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण स्वदेशी विचार अबाधित ठेवण्यासाठी या व्यक्तीने रविवारी आपली शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्याने सोमवारी शाळेला सुट्टी जाहिर केली. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे. भूषणचंद्र हलदर आणि अविनाशचंद्र हलदर अशी या शाळेच्या स्थापनेशी संबंधित असलेली नावं आहेत. शाळा सुरू करण्याचा उपक्रम संपूर्णपणे अविनाशचंद्र हलदर यांचा होता आणि त्यांना भूषणचंद्र हलदर यांचं मार्गदर्शन लाभलं. याकरिता आर्थिक मदतीसाठी राजबल्लभ कुमार आणि विजय कृष्ण कुमार पुढे आले. ही शाळा मुळात त्यांच्या पुढाकाराने बांधली गेली. या शाळेची स्थापना 5 जानेवारी 1922 रोजी झाली. सध्या या शाळेतली विद्यार्थी संख्या 972 आहे. या शाळेतला इयत्ता दहावीचा विद्यार्थी आतिफ मलिक याच्या म्हणण्यानुसार, `विद्यार्थ्यांनीही या जुन्या निर्णयाशी जुळवून घेतलं आहे. मला रविवारी शाळेत यायला आवडतं आणि माझे सर्व मित्र ही माझ्यासोबत येतात. आमच्या शाळेला सोमवारी सुट्टी असल्याचे अनेक फायदे आहेत. काही सरकारी काम असेल तर ते सोमवारी करता येतं. रविवारी सुट्टी असल्यास सरकारी कामं होत नाहीत.` 101 वर्षं जुन्या असलेल्या या शाळेतल्या शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच हा नियम खूप सोयीचा वाटतो. या नियमाला सरकारने सुरुवातीला आक्षेप घेतला होता; मात्र कागदपत्रं तपासल्यावर आणि इतिहास जाणून घेतल्यावर सर्व आक्षेप दूर झाले, अशीही माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या